Thieves on the rampage : डोणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, बंद घरांनंतर आता मुख्य बाजारपेठेतील सराफा दुकानावरही चोरट्यांनी डोळा ठेवला आहे. २३ जुलैच्या मध्यरात्री मुख्य चौकातील ‘सूरज ज्वेलर्स’ या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे.

चोरीचे सत्र थांबेना; ज्वेलर्सच्या दुकानात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न, पोलिसांसमोर मोठे आव्हान
डोणगाव : डोणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, बंद घरांनंतर आता मुख्य बाजारपेठेतील सराफा दुकानावरही चोरट्यांनी डोळा ठेवला आहे. २३ जुलैच्या मध्यरात्री मुख्य चौकातील ‘सूरज ज्वेलर्स’ या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य चौकातील अमोल विष्णू घोडके यांच्या मालकीच्या सूरज ज्वेलर्स या दुकानाला मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने लक्ष्य केले. दुकानात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न करण्यात आला; मात्र, प्राथमिक माहितीनुसार चोरट्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे कोणताही ऐवज चोरीला गेला नसल्याचे समोर आले आहे. मात्र, या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
घटनेची माहिती मिळताच दुकानमालकाने डोणगाव पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय आजमिरे, पोलीस कॉन्स्टेबल हर्ष सहगल, यशवंत चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दुकानाचे शटर, कुलूप आणि प्रवेशमार्गाची बारकाईने तपासणी करण्यात आली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, डोणगावात अलिकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात खंडोबा परिसरातील विठ्ठल शिंदे यांच्या बंद घरातून चोरट्यांनी भरदिवसा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर शिक्षक विश्वास बोंडगे यांच्या बंद घरावरही चोरट्यांनी डल्ला मारला. या दोन्ही घटनांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसतानाच सराफा दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
मुख्य बाजारपेठेसारख्या वर्दळीच्या भागात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांचा गांभीर्याने विचार करून रात्रीची पोलीस गस्त वाढविणे, बाजारपेठेत अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारणे आणि चोरट्यांचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी व्यापारी व सराफा व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे डोणगावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

