Mahabreaking

[breaking_news]

Gram Panchayat elections :ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडणार ; प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीला स्थगिती

Gram Panchayat elections : राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागला असून, २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करू नये, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Gram Panchayat elections
मतदार यादी कार्यक्रमात मोठा बदल; ग्रामपंचायत निवडणुकांचे वेळापत्रक सुधारित होणार

गजानन तिडके 
बुलढाणा : राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागला असून, २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करू नये, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २४ जुलै रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR-2026) कार्यक्रमामुळे विधानसभा मतदार याद्यांचे पुनरीक्षण सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या अंतिम करण्यासाठी आवश्यक असलेला आधार अद्याप पूर्ण झालेला नाही.
यापूर्वी आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती, त्यानंतर २९ जुलैपर्यंत हरकती व सूचना स्वीकारून ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची विनंती आयोगाकडे केली होती.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनीही विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्याची सूचना केली होती. याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने सध्याचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार, राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींपैकी अत्यल्प ग्रामपंचायतींच्याच प्रारूप मतदार याद्या संगणक प्रणालीवर पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण याद्यांच्या आधारे निवडणूक प्रक्रिया राबविणे योग्य ठरणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना २४ जुलै रोजी कोणतीही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करू नये, तसेच सुधारित कार्यक्रम व पुढील सूचना स्वतंत्रपणे कळविण्यात येतील, असे आदेश दिले आहेत.

राजकीय परिणामांची चर्चा
ग्रामपंचायत निवडणुका या राज्यातील ग्रामीण राजकारणाचा पाया मानल्या जातात. अनेक ठिकाणी स्थानिक राजकीय गट, प्रमुख पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला असताना आयोगाच्या या निर्णयामुळे त्यांच्या नियोजनावर परिणाम होणार आहे. मतदार याद्यांतील अचूकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे आयोगाने स्पष्ट केले असले, तरी निवडणुकीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या सुधारित कार्यक्रमाकडे लागले आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम आणि पुढील निवडणूक प्रक्रिया लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबतचा पुढील निर्णय आयोगाच्या नव्या वेळापत्रकानंतरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top