Maulana Ismail Ishaati : स्थानिक मशिदीत आयोजित करण्यात आलेल्या शुक्रवारच्या खुतब्यात मौलाना इस्माईल इशाअती यांनी “अहंकार, गर्व आणि दंभाची निंदा” या विषयावर सखोल मार्गदर्शन करत समाजाला नम्रता, सदाचार आणि चांगल्या चारित्र्याचा संदेश दिला.

‘सत्याचा स्वीकार आणि नम्रता अंगीकारा’; शुक्रवारच्या खुतब्यातून मौलाना इस्माईल इशाअती यांचे मार्गदर्शन
बाळापूर : स्थानिक मशिदीत आयोजित करण्यात आलेल्या शुक्रवारच्या खुतब्यात मौलाना इस्माईल इशाअती यांनी “अहंकार, गर्व आणि दंभाची निंदा” या विषयावर सखोल मार्गदर्शन करत समाजाला नम्रता, सदाचार आणि चांगल्या चारित्र्याचा संदेश दिला.

यावेळी बोलताना मौलाना इस्माईल इशाअती म्हणाले की, ‘तकब्बुर’ (अहंकार) म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे, सत्याचा स्वीकार करण्यास नकार देणे आणि इतरांना कमी लेखणे होय. इस्लाम धर्मात अहंकाराला अत्यंत गंभीर पाप मानले गेले असून, नम्रता ही प्रत्येक मुस्लिमाची ओळख असावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुरआन आणि हदीसचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, इतिहासात अहंकाराच्या आहारी गेलेल्या अनेक व्यक्ती आणि समाजांचा शेवट अत्यंत दुःखद झाला आहे. फिरऔन आणि कारून यांसारख्या उदाहरणांतून प्रत्येकाने बोध घ्यावा. सत्ता, संपत्ती किंवा ज्ञानाचा गर्व माणसाला विनाशाच्या मार्गावर नेतो, तर नम्रता त्याला अल्लाहच्या कृपेस पात्र बनवते, असे त्यांनी सांगितले.
मौलाना यांनी उपस्थितांना जीवनात संयम, प्रामाणिकपणा, सदाचार आणि अल्लाहची भीती (तक्वा) जोपासण्याचे आवाहन केले. गर्व, अहंकार आणि दंभ यांसारख्या नकारात्मक प्रवृत्तींपासून दूर राहून समाजात प्रेम, बंधुता, परस्पर आदर आणि सद्भावनेचा संदेश देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
खुतब्याच्या शेवटी त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीने सत्याचा स्वीकार करून विनम्रतेने जीवन जगावे, तसेच नैतिक मूल्यांचे पालन करून समाजात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.

