Estimates Committee : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीचा ३० जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्याचा तीन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागप्रमुखांची आढावा बैठक पार पडली.

अंदाज समितीच्या दौऱ्यापूर्वी प्रशासन सतर्क; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना स्पष्ट निर्देश
बुलढाणा : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीचा ३० जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्याचा तीन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागप्रमुखांची आढावा बैठक पार पडली.
बैठकीत अंदाज समितीच्या दौऱ्यादरम्यान विविध शासकीय योजनांचा आढावा, विकासकामांचे सादरीकरण तसेच प्रत्यक्ष पाहणीसंदर्भातील नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना त्यांच्या अखत्यारीतील विकासकामांची अद्ययावत, अचूक आणि परिपूर्ण माहिती तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या. समितीसमोर सादर करण्यात येणारी आकडेवारी स्पष्ट, पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी, यावर त्यांनी विशेष भर दिला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देवरे म्हणाले की, विधिमंडळ अंदाज समितीचा हा दौरा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून कोणत्याही विभागाने कामात हलगर्जीपणा करू नये. सर्व प्रशासकीय तयारी विहित वेळेत पूर्ण करून समितीसमोर प्रभावी आणि वस्तुनिष्ठ सादरीकरण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
दौऱ्यादरम्यान समितीकडून जिल्ह्यातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा तसेच जनकल्याणकारी योजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. कृषी, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, शिक्षण आदी विभागांना आपले अहवाल अंतिम स्वरूपात तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच समिती सदस्यांच्या प्रश्नांना तात्काळ आणि अचूक उत्तरे देता यावीत, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी संपूर्ण माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले.
याशिवाय समिती सदस्यांच्या निवास, वाहतूक, भोजन व्यवस्था, दौऱ्याचे नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाव खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

