Deulgaon Mahi: नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांचा निषेध आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात गुरुवारी देऊळगाव मही येथे विद्यार्थी, पालक, युवक आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजी आणि निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी करत केंद्र सरकारवर टीका केली.

नीटसह कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ देऊळगाव महीत मोर्चा; विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांचा निषेध आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात गुरुवारी देऊळगाव मही येथे विद्यार्थी, पालक, युवक आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजी आणि निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी करत केंद्र सरकारवर टीका केली.
छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हातात तिरंगा ध्वज आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन सहभागी नागरिकांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला. “पेपर चोर गद्दी छोड”, “शिक्षण वाचवा, देश-घटना वाचवा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “इन्कलाब जिंदाबाद”, “भारत माता की जय”, “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या”, “पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनकर्त्यांनी कथित पेपरफुटी प्रकरणांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कायदेशीर यंत्रणा उभारावी, अशी मागणीही करण्यात आली.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईचाही निषेध आंदोलनकर्त्यांनी नोंदविला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने मांडल्या जाणाऱ्या मागण्यांकडे दडपशाहीऐवजी संवादातून पाहण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी नमूद केले.
या मोर्चात विद्यार्थी, पालक, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक बंदोबस्त ठेवला होता.
स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि विद्यार्थी प्रश्न हे आगामी काळातही महत्त्वाचे राजकीय मुद्दे ठरण्याची चिन्हे आहेत. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून या प्रश्नांवर जनमत तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून, ग्रामीण भागातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

