Mahabreaking

[breaking_news]

Deulgaon Raja :देउळगाव राजात शहर विकास आघाडी आक्रमक; मासिक सभेवर बहिष्कार, प्रवेशद्वारावर ठिय्या

Deulgaon Raja : नगरपालिका प्रशासनाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी गुरुवारी मासिक सभेवर बहिष्कार टाकत पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तसेच नगराध्यक्षांच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी शहर विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.

Deulgaon Raja

 ‘विकासकामांत दुजाभाव, विरोधकांना न्याय नाही’;  मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी मागण्या समजून घेत दिले आश्वासन

गजानन तिडके

देऊळगाव राजा : नगरपालिका प्रशासनाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी गुरुवारी मासिक सभेवर बहिष्कार टाकत पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तसेच नगराध्यक्षांच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी शहर विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.

आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या, मूलभूत सुविधांबाबतच्या तक्रारी आणि विकासकामांचे प्रस्ताव वारंवार मांडूनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. प्रशासनाकडून ना समाधानकारक उत्तर दिले जाते, ना निर्णय घेतला जातो. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे आघाडीच्या सदस्यांनी सांगितले.

विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसाठी पालिकेत स्वतंत्र केबिन उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा मुद्दाही आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला. सत्ताधारी गटाचे गटनेते व सभापती यांना स्वतंत्र केबिन उपलब्ध असताना विरोधी पक्षाच्या गटनेत्या व नगरसेवकांना ती सुविधा नाकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला. विशेषतः महिला नगरसेविकांना बसण्यासाठी व नागरिकांची कामे पाहण्यासाठी योग्य जागा नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

मासिक सभेच्या विषयपत्रिकेसोबत नियमानुसार स्पष्टीकरणात्मक टिपणी वेळेत दिली जात नसल्याचाही आरोप करण्यात आला. ऐन सभेच्या वेळी टिपणी दिल्यामुळे विषयांचा अभ्यास करून प्रभावी चर्चा करणे शक्य होत नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

याशिवाय, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सुचविलेली प्रभागनिहाय विकासकामे जाणीवपूर्वक विषयपत्रिकेत समाविष्ट केली जात नसल्याने शहराच्या विकासात राजकीय भेदभाव होत असल्याचा आरोपही करण्यात आला. या सर्व मुद्द्यांच्या निषेधार्थ शहर विकास आघाडीच्या सदस्यांनी सभागृहात न जाता पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, आंदोलनस्थळी आलेले मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी आंदोलकांशी चर्चा करून मांडण्यात आलेल्या मागण्यांची दखल घेत त्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

या आंदोलनात शहर विकास आघाडीच्या गटनेत्या रंजना रामाणे, नगरसेवक काशीफ खान कोटकर, शिवाजी मेहत्रे, नगरसेविका दिशा खांडेभराड, शीतल खरात, विद्या कासारे, अनुमाया यांच्यासह आघाडीचे इतर नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top