Married woman harassed for dowry: पाच लाख रुपये आणि फ्लॅटची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने भरोसा सेलकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात आली.

पाच लाख रुपये व फ्लॅटच्या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ; सासरच्या सहा जणांवर कारवाई
बुलढाणा : पाच लाख रुपये आणि फ्लॅटची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने भरोसा सेलकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार फातिमा हलीमा सादिया यांनी भरोसा सेल, बुलढाणा येथे दिलेल्या तक्रारीत सासरच्या मंडळींकडून सातत्याने होत असलेल्या छळाची माहिती दिली. तक्रारीनुसार, विवाहानंतर सुरुवातीचे तीन ते चार महिने सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर सासू हलीमाबी बशीर शहा आणि सासरे बशीर शहा लुकमान शहा यांनी घरगुती कामांमध्ये चुका काढून टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
तसेच, दीर शेहजाद शहा, चुलत सासरे अन्वर शहा आणि मुनीर शहा हे पती शाहीन शहा बशीर शहा यांना फिर्यादीविरुद्ध सतत भडकवत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या वडिलांच्या मालकीचे देऊळगाव राजा येथील फ्लॅटपैकी एक फ्लॅट तिच्या पतीच्या नावावर करून द्यावा तसेच व्यवसायासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, अशी बेकायदेशीर मागणी आरोपींकडून करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही मागणी पूर्ण न केल्यास फिर्यादीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला. तसेच तिच्या आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. याशिवाय, फिर्यादीच्या भावाला फोन करून “बहिणीला घेऊन जा” असे सांगून तिला घरातून जाण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी शाहीन शहा बशीर शहा (पती), बशीर शहा लुकमान शहा (सासरे), हलीमाबी बशीर शहा (सासू), शेहजाद शहा बशीर शहा (दीर), अन्वर शहा लुकमान शहा आणि मुनीर शहा (चुलत सासरे), सर्व रा. इंदिरा नगर, बुलढाणा, यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नागरे करीत आहेत.

