Sindkhed Raja Tehsils : शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि विविध शासकीय योजनांच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा तहसील कार्यालयाने ऑनलाइन प्रमाणपत्र वितरणात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत तब्बल ५,४०९ ऑनलाइन प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून, त्यामुळे हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उपविभागीय अधिकारी संजय खडसे व तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाची धडक मोहीम
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि विविध शासकीय योजनांच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा तहसील कार्यालयाने ऑनलाइन प्रमाणपत्र वितरणात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत तब्बल ५,४०९ ऑनलाइन प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून, त्यामुळे हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती तसेच विविध शासकीय योजनांसाठी उत्पन्न, जात, नॉन-क्रिमीलेयर, अधिवास आदी प्रमाणपत्रांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांची तहसील कार्यालयाच्या वारंवार फेऱ्यांपासून सुटका व्हावी आणि त्यांचा वेळ व खर्च वाचावा, या उद्देशाने तहसील प्रशासनाने विशेष मोहीम राबवून अर्जांचा तातडीने निपटारा केला.
नायब तहसीलदार डॉ. प्रवीण वराडे, वरिष्ठ लिपिक संजय सोनुने आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अर्जांची छाननी करून प्रमाणपत्रांचे वेळेत वितरण केल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.
१ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत वितरित करण्यात आलेली प्रमाणपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र – २,६४४
- रहिवासी प्रमाणपत्र – ६५
- वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र – १,०७९
- शेतकरी प्रमाणपत्र – ४०
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र – ५९
- पत/हैसियत दाखला – १३
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र – १,३२९
- जात प्रमाणपत्र – १,१७९
अशा प्रकारे विविध प्रकारची एकूण ५,४०९ ऑनलाइन प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
महसूल विभागाच्या या कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचला असून, विशेषतः विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रे वेळेत मिळाल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत झाली आहे. तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रेही वेळेत उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तहसील कार्यालयाच्या या लोकाभिमुख आणि तत्पर कार्यपद्धतीबद्दल तालुक्यातील विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ तसेच विविध स्तरांतील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार डॉ. प्रवीण वराडे, वरिष्ठ लिपिक संजय सोनुने आणि संपूर्ण महसूल पथकाचे कौतुक केले आहे.

