bank account : देशातील विविध राज्यांतील नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी वापर झाल्याचा संशय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, देऊळगाव राजा शाखेतील एका बँक खात्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला असून सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

NCRP ‘समन्वय’ पोर्टलवरील विश्लेषणातून फसवणुकीचे जाळे उघड; चार राज्यांतील नागरिकांची फसवणूक झाल्याचा संशय
गजानन तिडके
देऊळगाव राजा : देशातील विविध राज्यांतील नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी वापर झाल्याचा संशय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, देऊळगाव राजा शाखेतील एका बँक खात्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला असून सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई पवन दादाराव दुनगहू (वय २७) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने सादर केलेल्या लेखी अहवालानुसार, बँक ऑफ महाराष्ट्र, देऊळगाव राजा शाखेतील खाते क्रमांक 60398430409 (IFSC : MAHB0000406) याचा Mule Bank Account म्हणून वापर झाल्याची बाब समोर आली आहे.
सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या NCRP (National Cyber Crime Reporting Portal) – Samanvay Portal वरील Money Trail Analysis दरम्यान संबंधित खात्यामध्ये आर्थिक फसवणुकीशी संबंधित व्यवहार आढळून आले. तसेच या खात्याविरोधात देशातील विविध राज्यांमध्ये तक्रारी नोंद झालेल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
प्राथमिक तपासात या खात्याच्या माध्यमातून देशातील किमान चार नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित बँक खात्याचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२५/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्याकडे सोपविण्यात आला असून, संबंधित बँक खातेधारक, आर्थिक व्यवहारांची साखळी तसेच फसवणुकीमागील संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना बँक खात्याचा वापर करू देऊ नये, तसेच कोणतीही संशयास्पद आर्थिक व्यवहाराची माहिती तात्काळ पोलिसांना किंवा NCRP पोर्टलवर कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

