Theft : शहरातील कराळे ले-आऊट परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरात झालेल्या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीला मुद्देमालासह अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून मंदिरातील चोरीस गेलेला १८ हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला असून, या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने मंदिरचोरी उघड; १८ हजारांचा ऐवज हस्तगत
बुलढाणा : शहरातील कराळे ले-आऊट परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरात झालेल्या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीला मुद्देमालासह अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून मंदिरातील चोरीस गेलेला १८ हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला असून, या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराळे ले-आऊट येथील रहिवासी रामकृष्ण हरीचंद्र राठोड (वय ६४) यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सिद्धेश्वर महादेव मंदिरात १६ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवेश करून मंदिरातील धार्मिक साहित्याची चोरी केली होती.
चोरीमध्ये तांब्याची मोठी व छोटी जलधारा, पितळी समई, मोठा नंदादीप, देवीच्या मूर्तीचे चांदीचे नाक तसेच मारोती व नंदीच्या मूर्तींचे चांदीचे डोळे असा एकूण १८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांना विशेष पथक स्थापन करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयिताची ओळख पटविली.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी आकाश शिवरतन बाहेती (वय ५०, रा. पवार ले-आऊट, बुलढाणा) हा चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिवाजी शाळा परिसरातून भिलवाड्याकडे जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने सिद्धेश्वर महादेव मंदिरातील चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण १८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला बुलढाणा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक (खामगाव) पियुष जगताप आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे आणि चाँद शेख यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

