Healthcare system : ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आणि तत्काळ आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ‘आपला दवाखाना’ योजना सुरू केली आहे. मात्र, देऊळगाव राजा तालुक्यात या यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असून, लाखो रुपयांचा शासकीय खर्च होऊनही रुग्णांना मूलभूत आरोग्य सेवेसाठी खासगी दवाखान्यांची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग हा जनतेच्या सेवेसाठी आहे की केवळ कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

सरकारी पगार, खाजगी प्रॅक्टिस आणि ओस पडलेली आरोग्य केंद्रे; तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
गजानन तिडके
देऊळगाव राजा : ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आणि तत्काळ आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ‘आपला दवाखाना’ योजना सुरू केली आहे. मात्र, देऊळगाव राजा तालुक्यात या यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असून, लाखो रुपयांचा शासकीय खर्च होऊनही रुग्णांना मूलभूत आरोग्य सेवेसाठी खासगी दवाखान्यांची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग हा जनतेच्या सेवेसाठी आहे की केवळ कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
मुख्यालय सोडून कर्मचारी गायब?
नियमानुसार ग्रामपातळीवर नियुक्त आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. काही अपवाद वगळता अनेक कर्मचारी केवळ कागदोपत्री मुख्यालयी असल्याचे दाखवतात. परिणामी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
लाखो रुपयांचा खर्च; सेवा मात्र निराशाजनक
आरोग्य विभागावर दरमहा लाखो रुपयांचा खर्च केला जातो. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच आरोग्य सेवांसाठी निधी खर्च होत असला तरी त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. गावपातळीवर पाणी नमुने तपासणी, लसीकरण, साथीच्या रोगांवर नियंत्रण आणि प्राथमिक उपचार यांसारख्या मूलभूत सेवाही अनेक ठिकाणी नियमितपणे मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
सरकारी नोकरी; खाजगी प्रॅक्टिसचा मोह?
तालुक्यातील काही वैद्यकीय अधिकारी शासकीय सेवेसोबत खासगी दवाखाने चालवत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोग्य संघटनांचा दबाव?
वरिष्ठ अधिकारी कामाबाबत जाब विचारताच काही कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे निष्क्रिय कर्मचाऱ्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. जनतेच्या मते, अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय ग्रामीण आरोग्य सेवा सुधारण्याची शक्यता कमी आहे.
अशी आहे तालुक्यातील आरोग्य व्यवस्था
तालुक्यात जवळखेड आणि अंढेरा अशी दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत.
जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्रे :
- असोला जहांगीर
- बोराखेडी बावरा
- गिरोली बुद्रुक
- मेहुना राजा
- सावखेड भोई
- भिवगाव बुद्रुक
- सिंगाव जहांगीर
अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्रे :
- अंढेरा
- देऊळगाव मही
- दिग्रस बुद्रुक
- मंडपगाव
- मेंडगाव
- निमगाव गुरु
- सावखेड नागरे
- सरंबा
याशिवाय संजयनगर माळीपुरा आणि त्र्यंबकनगर येथे ‘आपला दवाखाना’ केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी उपकेंद्रातील कर्मचारीही मुख्यालयी राहत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
कर्मचारी पदांची सद्यस्थिती
- वैद्यकीय अधिकारी (गट-अ) : मंजूर ४, कार्यरत ३, रिक्त १
- वैद्यकीय अधिकारी (गट-ब) : मंजूर १, कार्यरत १
- आरोग्य सहाय्यक : मंजूर ५, कार्यरत ५
- आरोग्य सहायिका : मंजूर ४, कार्यरत ३, रिक्त १
- आरोग्य सेवक : मंजूर २०, कार्यरत १८, रिक्त २
- आरोग्य सेविका : मंजूर २०, कार्यरत ११, रिक्त ९
रिक्त पदांमुळे आधीच मनुष्यबळाची कमतरता असून उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.

“आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबत यापूर्वीही आदेश देण्यात आले आहेत. ग्रामपातळीवर सेवा नियमित मिळावी यासाठीही सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध आहे.”
डॉ. सदानंद बडसोड,तालुका आरोग्य अधिकारी

