Damini Squad :शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या तसेच टवाळखोरी करणाऱ्या तरुणांविरोधात डोणगाव पोलिसांच्या दामिनी पथकाने धडक कारवाई करत पाच तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करून पालकांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आणि समज देऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

बसस्थानक परिसरातील टवाळखोरांना पोलिसांचा दणका
डोणगाव : शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या तसेच टवाळखोरी करणाऱ्या तरुणांविरोधात डोणगाव पोलिसांच्या दामिनी पथकाने धडक कारवाई करत पाच तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करून पालकांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आणि समज देऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून डोणगाव बसस्थानक व परिसरात शाळा व महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत काही तरुणांकडून विद्यार्थिनींची छेड काढणे, टवाळखोरी करणे आणि संशयास्पदरीत्या वावरण्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांनी घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने परिसरात गुप्त पद्धतीने गस्त सुरू केली.
शुक्रवार (दि. १७ जुलै) रोजी दामिनी पथकाने अचानक डोणगाव बसस्थानक परिसरात धडक कारवाई केली. या पथकात दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक द्रौपदी साळवे, पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी मुळे, चालक पहारे, डोणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजमिरे तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी हर्ष सहगल यांचा समावेश होता.
कारवाईदरम्यान मुलींना त्रास देत असल्याच्या संशयावरून पाच तरुणांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर संबंधितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून मुलांच्या वर्तनाची माहिती देण्यात आली. भविष्यात अशा प्रकारची तक्रार आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला.
दामिनी पथक प्रमुख द्रौपदी साळवे यांनी सांगितले की, “महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे. छेडछाड किंवा त्रासाचा कोणताही प्रकार घडल्यास मुलींनी न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा प्रकारच्या कृत्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही.”
या कारवाईनंतर डोणगाव परिसरातील विद्यार्थिनी, महिला आणि पालकांनी समाधान व्यक्त केले असून, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी अशा मोहिमा नियमितपणे राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

