Free bicycles distributed : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा शिक्षणप्रवास अधिक सुलभ व्हावा आणि शिक्षणाबाबत त्यांच्यातील उत्साह वाढावा, या उद्देशाने लोणी गवळी येथील बाबुराव पाटील विद्यालयात मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले. विद्यालयातील एकूण ४७ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळाला.

मानव विकास मिशनचा उपक्रम; ४७ विद्यार्थिनींचा शिक्षणप्रवास झाला अधिक सुलभ
डोणगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा शिक्षणप्रवास अधिक सुलभ व्हावा आणि शिक्षणाबाबत त्यांच्यातील उत्साह वाढावा, या उद्देशाने लोणी गवळी येथील बाबुराव पाटील विद्यालयात मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले. विद्यालयातील एकूण ४७ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील होते, तर विद्यालयाचे प्राचार्य सुरेश हिवरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष भास्करराव पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागातील अनेक मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी दररोज लांबचे अंतर पायी पार करावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि ऊर्जा खर्च होते. मानव विकास मिशनअंतर्गत मिळालेल्या सायकलींमुळे विद्यार्थिनींचा प्रवास अधिक सुलभ होईल, त्यांचा वेळ वाचेल आणि त्या अधिक आत्मविश्वासाने तसेच नियमितपणे शाळेत येऊ शकतील.
प्राचार्य सुरेश हिवरकर यांनी शासनाच्या या कल्याणकारी योजनेचे स्वागत करत, सायकलींच्या माध्यमातून विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती वाढण्यास आणि शिक्षणाला अधिक चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सविता अडागळे यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सायकलींचे वितरण होताच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षकांनी केले.

