Daylight burglary :स्थानिक छत्रपती नगर, खंडोबा परिसरातील एका शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. १६) भरदिवसा घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून डोणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड चोरी; डोणगावात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ
डोणगाव : स्थानिक छत्रपती नगर, खंडोबा परिसरातील एका शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. १६) भरदिवसा घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून डोणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल रामचंद्र शिंदे (वय ४२, रा. छत्रपती नगर, डोणगाव) हे व्यवसायाने शिक्षक आहेत. गुरुवारी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेदरम्यान ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे शॉर्ट गंठण (अंदाजे किंमत २० हजार रुपये), ३ ग्रॅम वजनाचे कानातील वेल (६ हजार रुपये), ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके (१० हजार रुपये), ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन डोळे (६ हजार रुपये) तसेच ९ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५१ हजार रुपयांचा ऐवज आहे.
दुपारी घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसताच चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विठ्ठल शिंदे यांनी तातडीने डोणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक २१७/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) व ३३१(३) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय आजमिरे करीत आहेत.
भरदिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे डोणगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात गावात चोरी व इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यापूर्वी वीज खांबावरील अॅल्युमिनियम तारा चोरीला जाण्याच्या घटना घडल्या असून बसस्थानक परिसरात चोऱ्या व किरकोळ वादाचे प्रकारही वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी रात्रीसह दिवसा गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

