Councilors disqualified; बाळापूर नगरपरिषदेतील दोन नगरसेवकांना जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी, अकोला यांनी मंगळवारी (१४ जुलै) दोन्ही नगरसेवकांना तात्काळ प्रभावाने अपात्र (अनर्ह) घोषित केले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने संबंधित नगरसेवकांचे इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जात दावे अवैध ठरविल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. परिणामी दोन्ही नगरसेवकांची सदस्यता रद्द झाली असून त्यांच्या जागा रिक्त घोषित करण्यात आल्या आहेत.

बाळापूरच्या राजकारणाला धक्का; भाजप गटनेत्यासह दोन नगरसेवकांची सदस्यता रद्द
बाळापूर : बाळापूर नगरपरिषदेतील दोन नगरसेवकांना जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी, अकोला यांनी मंगळवारी (१४ जुलै) दोन्ही नगरसेवकांना तात्काळ प्रभावाने अपात्र (अनर्ह) घोषित केले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने संबंधित नगरसेवकांचे इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जात दावे अवैध ठरविल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. परिणामी दोन्ही नगरसेवकांची सदस्यता रद्द झाली असून त्यांच्या जागा रिक्त घोषित करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ तसेच महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जात प्रमाणपत्राचे नियमन व पडताळणी) अधिनियम, २००० मधील तरतुदींनुसार हा आदेश पारित केला.

प्रभाग क्रमांक ७-अ मधून ‘नगरविकास पक्ष–वंचित आघाडी’च्या उमेदवार म्हणून निवडून आलेल्या श्रीमती निखत नाझ अकील अहमद (निखत नाझ अब्दुल रफीक) यांनी सादर केलेला ‘मोमीन’ (ओबीसी) प्रवर्गातील जात दावा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविला होता. तसेच, प्रभाग क्रमांक ८-अ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आणि नगरपरिषदेतील भाजपचे गटनेते अब्दुल गुफरान अब्दुल गफ्फार यांचा ‘जुलाहा’ (ओबीसी) जातीचा दावा देखील समितीने अमान्य केला होता. त्यानंतर दोन्ही नगरसेवकांच्या सदस्यत्वाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात श्रीमती नुसरत जहाँ रईस अहमद आणि मोहम्मद सोहेल मोहम्मद हुसेन यांनी संबंधित नगरसेवकांना अपात्र घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. अनिस मस्तान शाह आणि ॲड. मोहम्मद ऐनोद्दीन परवेझ अरमानी यांनी बाजू मांडली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आदेश, उपलब्ध कागदपत्रे आणि कायदेशीर तरतुदींचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही नगरसेवकांना अनर्ह घोषित केले. या आदेशानंतर दोन्ही सदस्यांची नगरपरिषदेतील सदस्यता तात्काळ प्रभावाने संपुष्टात आली असून संबंधित प्रभागांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या निर्णयामुळे बाळापूर नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रिक्त झालेल्या जागांबाबत पुढील निवडणूक प्रक्रिया कायद्यानुसार राबविण्यात येणार आहे.

