Shivni flyover remains incomplete : अकोला शहरातील शिवणी विमानतळासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील उड्डाणपूलाचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या प्रकरणात शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास २० जुलै रोजी दुपारी १२ वाजता शिवणी विमानतळासमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

शिवणी विमानतळासमोरील उड्डाणपूल रखडला; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
संजय तायडे
अकोला : अकोला शहरातील शिवणी विमानतळासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील उड्डाणपूलाचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या प्रकरणात शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास २० जुलै रोजी दुपारी १२ वाजता शिवणी विमानतळासमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शिवणी विमानतळासमोरील उड्डाणपूलाचे काम काही काळापूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र, विमानतळाच्या उंचीविषयक नियमांमुळे हे काम पुढे थांबविण्यात आल्याने पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. संबंधित विभागाने नियमांची पुरेशी पडताळणी न करता प्रकल्पाला मंजुरी दिल्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाला असून, तो वाया गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व विभागांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय, उड्डाणपूलाच्या कामासाठी वापरण्यात आलेली फ्लाय ॲश (राख) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पसरल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, धुळीमुळे श्वसनविकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याची तातडीने साफसफाई करून बॅरिकेडिंग, सूचना फलक आणि नियमित पाणी मारण्यासारख्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अर्धवट उड्डाणपूलाचे काम तातडीने पूर्ण करावे किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तो हटविण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा स्थानिक नागरिकांच्या सहभागातून २० जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी देवेश पातोडे, जीवन डिगे, आकाश शिरसाट, आकाश इंगळे, निखील वाकोडे, राजकुमार शिरसाट, मिलिंद शिरसागर, प्रितेश गवई, गौतम सुरडकर, रोशन इंगळे, रोहित शेगोकार, शेख सोहेल, शेख जाकीर, गोलू गोपनारायण, चंदू वैरागळे, विक्की वानखडे, चंदू गोपनारायण, रवी इंगळे, सद्दाम शेख, संदीप सुरडकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

