Allegations of corruption : अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू ग्रामपंचायतीअंतर्गत १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ धनंजय लक्ष्मणराव देशमुख, ऋतिक ओंकार अनासाने यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

पहिल्याच पावसात नाली वाहून गेल्याचा दावा; पंचायत समितीकडे तक्रार, आंदोलनाचा इशारा
अकोला : अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू ग्रामपंचायतीअंतर्गत १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ धनंजय लक्ष्मणराव देशमुख, ऋतिक ओंकार अनासाने यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, बोरगाव मंजू येथील वार्ड क्रमांक १ मध्ये १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे १७ लाख ६२ हजार ६३० रुपये मंजूर करून सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या कामासाठी मंजूर निधीच्या तुलनेत अत्यल्प खर्च करण्यात आला असून उर्वरित निधीमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच, पावसाळ्याच्या पहिल्याच पावसात संबंधित नालीचे बांधकाम वाहून गेल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यासंदर्भातील छायाचित्रे पुरावा म्हणून जोडल्याचेही तक्रारदाराने नमूद केले आहे.
या प्रकरणात सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला असून, संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करून मंजूर निधीची वसुली संबंधित जबाबदार व्यक्तींकडून करावी, तसेच कंत्राटदाराची चौकशी करून आवश्यक असल्यास त्याला ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीवर १५ दिवसांत कारवाई न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या तक्रारीच्या प्रती पोलीस अधीक्षक, अकोला तसेच विभागीय आयुक्त (विकास), अमरावती विभाग यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

