Raid on gambling: अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापशी तलाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण ₹२ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; रोख रक्कम, मोबाईल व दुचाकीसह ₹२.०८ लाखांचा ऐवज जप्त
निशांत गवई
पातूर : अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापशी तलाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण ₹२ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कापशी तलाव परिसरातील चंद्रभान मांजरे यांच्या शेतातील टिनशेडसमोर सुरू असलेल्या ‘परेल’ नावाच्या जुगारावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान चार जणांना रंगेहात पकडण्यात आले.
पोलिसांनी आरोपींकडून ₹३८ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम, सहा मोबाईल फोन (अंदाजे किंमत ₹१.२० लाख) आणि ₹५० हजार किमतीची मोटारसायकल जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹२ लाख ८ हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी चंद्रभान मांजरे (३७), सुमित मुंढे (३३), वैभव श्रीनाथ (२४) आणि संतोष इंगळे (४५) यांच्याविरुद्ध पातूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, जुगार, मटका, अवैध दारू आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अशा प्रकारच्या कारवाया पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहतील, असा इशारा अकोला पोलिसांनी दिला आहे.

