Mahabreaking

[breaking_news]

Stepped out for a run: रनिंगसाठी घराबाहेर पडले.. पण परतलेच नाहीत; पूर्णा नदीच्या पात्रात दोन मुले बुडाली  

Stepped out for a run:  उत्साहाने रविवारी सकाळी रनिंगसाठी घराबाहेर पडलेल्या तीन मित्रांपैकी दोन जणांना काळाने पूर्णा नदीच्या पात्रात कायमचे हिरावून नेले. मानेगावजवळील पूर्णा नदीत अंघोळ करण्याचा मोह आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला. या हृदयद्रावक घटनेत प्रतीक शिवलाल वानखेडे (१३) आणि श्रीकृष्ण बाळू भोपळे (१४) या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, तर मिलिंद अजय वाकोडे (१३) याला ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुखरूप वाचविण्यात आले. रविवारी (दि. १२) सकाळी सुमारे ९ वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

Stepped out for a run

अंघोळीचा क्षण ठरला अखेरचा; पूर्णा नदीत बुडून आठवीतील दोन मित्रांचा दुर्दैवी अंत

नांदुरा : उत्साहाने रविवारी सकाळी रनिंगसाठी घराबाहेर पडलेल्या तीन मित्रांपैकी दोन जणांना काळाने पूर्णा नदीच्या पात्रात कायमचे हिरावून नेले. मानेगावजवळील पूर्णा नदीत अंघोळ करण्याचा मोह आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला. या हृदयद्रावक घटनेत प्रतीक शिवलाल वानखेडे (१३) आणि श्रीकृष्ण बाळू भोपळे (१४) या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, तर मिलिंद अजय वाकोडे (१३) याला ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुखरूप वाचविण्यात आले. रविवारी (दि. १२) सकाळी सुमारे ९ वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरा येथील हे तिघे मित्र सकाळी रनिंगसाठी घरातून बाहेर पडले होते. धावत-धावत ते मानेगावजवळील पूर्णा नदीपर्यंत पोहोचले. त्यानंतर उन्हाचा अंदाज घेत त्यांनी नदीवरील छोट्या पुलाखालील पात्रात अंघोळ करण्याचा निर्णय घेतला. मात्र नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने प्रतीक आणि श्रीकृष्ण यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडू लागले.

कमी पाण्यात असलेल्या मिलिंदने मित्रांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तो मदतीसाठी मोठ्याने आरडाओरड करू लागला. त्याचा आक्रोश ऐकून नदीकाठी शेतात काम करत असलेल्या नलिनी सोपान पाखरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. योगायोगाने त्याचवेळी तिवडी-अजमपूर येथील घाईट कुटुंबातील काही जण धार्मिक विधीसाठी नदीकाठी आले होते. त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उतरून मिलिंदला सुखरूप बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच मानेगाव येथील जलदूत आणि ग्रामस्थांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. सोपान पाखरे, गोपाल फंड, विकास पाखरे, विलास निंबोळकर, राजू पाखरे, संतोष मिरगे, किसनराव बाठे, गजानन पाखरे, सुनील इंगळे, उमेश पाखरे यांच्यासह अनेक युवकांनी जीवाची पर्वा न करता नदीत उतरून शोधकार्य सुरू केले. मात्र काही मिनिटांतच प्रतीक आणि श्रीकृष्ण यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन निष्पाप मुलांचे निश्चल देह पाहून घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील प्रमोद श्रीनाथ यांनी प्रशासनाला कळविले. त्यानंतर जळगाव जामोद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडित, अधिकारी सचिन बागुल व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ओम फाउंडेशनचे विलास निंबोळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

या दुर्दैवी घटनेमुळे नांदुरा परिसरात शोककळा पसरली असून दोन निरागस विद्यार्थ्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निष्काळजीपणे नदी, तलाव किंवा धरणात उतरण्याचे धोके पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top