sexual assault: उपचाराच्या बहाण्याने एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एका मौलानावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ६४(२)(एम), ७४ व ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान,गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला आहे.

धार्मिक उपचाराच्या नावाखाली गैरवर्तनाचा आरोप; आरोपीविरुद्ध बीएनएसअंतर्गत गुन्हा
निशांत गवई
पातूर : उपचाराच्या बहाण्याने एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एका मौलानावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ६४(२)(एम), ७४ व ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान,गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला येथील २९ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून मुजीब मौलाना (रा. मरहबा कॉलनी, मच्छी मार्केट, पातूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादीच्या मुलीला रात्री झोपेत बडबड होत असल्याने नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्या उपचारासाठी आरोपीकडे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादीलाही उपचाराची गरज असल्याचे सांगत उपचाराच्या नावाखाली तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. उपचार सुरू असल्यामुळे फिर्यादीने ही बाब तत्काळ कोणालाही सांगितली नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर आरोपीने पुढील उपचारासाठी पातूर येथे येण्यास सांगितले. फिर्यादी पतीसह आरोपीच्या घरी गेल्यानंतर आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर फिर्यादीने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला आणि दोघेही आपल्या गावी परतले. त्यानंतर आरोपी त्यांच्या घरी जाऊन स्वतःसोबत येण्यास सांगत, नकार दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या धमक्यांमुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
फिर्यादीने प्रथम बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर संबंधित नोंदीच्या आधारे प्रकरण पातूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. फिर्यादीच्या जबाबावरून गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ नोंदविण्यात आला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

