No doctor, no staff : साखरखेर्डा येथील श्रेणी-१ पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर यांची पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने दवाखान्याची सेवा जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे साखरखेर्ड्यासह परिसरातील २५ गावांतील शेतकरी व पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, तातडीने कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

२५ गावांच्या पशुधनाची गैरसोय; १५ ऑगस्टपर्यंत दवाखाना सुरू न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा
साखरखेर्डा : साखरखेर्डा येथील श्रेणी-१ पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर यांची पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने दवाखान्याची सेवा जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे साखरखेर्ड्यासह परिसरातील २५ गावांतील शेतकरी व पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, तातडीने कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, साखरखेर्डा येथे हजारो पशुधन असून या दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात २५ गावे येतात. दररोज अनेक शेतकरी व पशुपालक आजारी जनावरे, गायी, म्हशी तसेच शेळ्या उपचारासाठी दवाखान्यात घेऊन येतात. मात्र, दवाखान्यात कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्याने त्यांना निराश होऊन परत जावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सध्या पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याने पशुवैद्यकीय सेवेची गरज अधिक आहे. विशेषतः जनावरांच्या आकस्मिक आजारांवर तातडीने उपचार होणे आवश्यक असते. मात्र, दवाखाना बंद असल्याने पशुपालकांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत असून त्याचा आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान तसेच पशुधन पर्यवेक्षक व परिचारकांसाठी स्वतंत्र शासकीय निवासस्थाने उपलब्ध आहेत. मात्र, कर्मचारी नसल्याने ही इमारती वापराअभावी पडून आहेत. परिसरात स्वच्छतेचा अभाव असून काही ठिकाणी असामाजिक प्रकार घडत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शिंदीचे माजी उपसरपंच गंभीर खरात, शिवसेना विभागप्रमुख दिलीप सोभागे, युवासेना तालुकाप्रमुख संदीप मगर आणि उपसरपंच संग्रामसिंह राजपूत यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. १५ ऑगस्टपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व परिचारकांची नियुक्ती करून दवाखाना नियमित सुरू करण्यात आला नाही, तर १५ ऑगस्ट रोजी दवाखाना परिसरात गुरे-ढोरे घेऊन शेकडो शेतकरी बेमुदत उपोषणास बसतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या गंभीर प्रश्नाची पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणी परिसरातील शेतकरी व पशुपालकांकडून होत आहे.

