Suicide due : शहरातील त्र्यंबकनगर परिसरात शेजाऱ्यांकडून होत असलेल्या कथित त्रास, धमक्या आणि मानसिक छळाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

‘गाडीला हात लावून बघ, मर्डर करीन’ धमकीचा आरोप; त्र्यंबकनगरातील आत्महत्याप्रकरणी दोघांवर कारवाई
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील त्र्यंबकनगर परिसरात शेजाऱ्यांकडून होत असलेल्या कथित त्रास, धमक्या आणि मानसिक छळाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्का रमेश उगले (वय ३३, रा. त्र्यंबकनगर, देऊळगाव राजा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी राम चौधरी आणि सागर म्हस्के, दोघेही रा. त्र्यंबकनगर, देऊळगाव राजा, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा कायम अप क्रमांक ३१०/२०२६ असा असून, १० जुलै रोजी सायंकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून शेजारी राहतात. आरोपी राम चौधरी हा त्याची चारचाकी गाडी मुद्दाम फिर्यादीच्या घरासमोर उभी करत असे. याबाबत फिर्यादीचे पती रमेश गुलाबराव उगले यांनी जाब विचारला असता आरोपीकडून वाद घालण्यात येत असे. “रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? गाडीला हात लावून बघ, तुझा मर्डर करीन,” अशा प्रकारच्या धमक्या आरोपी देत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच दुसरा आरोपी सागर म्हस्के हाही नेहमी त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक दबाव निर्माण झाला होता. रमेश उगले यांच्यामुळे आरोपी घेत असलेल्या जमिनीचा सौदा रद्द झाला होता, अशी आरोपींची धारणा होती. याच कारणावरून आरोपींकडून रमेश उगले यांना वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सातत्यपूर्ण त्रासामुळे रमेश उगले हे कायम तणावाखाली राहत होते, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, २३ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास त्र्यंबकनगर येथे रमेश उगले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पत्नी अल्का उगले यांनी पतीच्या आत्महत्येस आरोपींच्या त्रास आणि धमक्याच कारणीभूत असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून देऊळगाव राजा पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपासपोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्याकडे सोपविण्यात आला असून, घटनेमागील नेमके कारण, शेजारील वादाचे स्वरूप, जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित बाबी आणि फिर्यादीतील आरोपांची शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे. तपासानंतर या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

