Truck overturns : देऊळगाव राजा–चिखली मार्गावरील असोला फाटा परिसरात दारूच्या नशेत ट्रक चालवून वाहन पलटी केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवार, १० जुलै रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली.

असोला फाट्यावर ट्रक अपघात; मद्यधुंद चालकावर मोवाका अंतर्गत कारवाई
गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा–चिखली मार्गावरील असोला फाटा परिसरात दारूच्या नशेत ट्रक चालवून वाहन पलटी केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवार, १० जुलै रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश पाटलिया जबुराई (वय ३४, रा. साईविहार कॉलनी, इंदोर, मध्यप्रदेश) असे आरोपी चालकाचे नाव आहे. तो ट्रक क्रमांक एमपी-०९-एचजे-७०७९ चालवत होता. संबंधित चालकाने मद्यप्राशन करून निष्काळजीपणे ट्रक चालविल्याने वाहन पलटी झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप क्रमांक ३११/२०२६ अन्वये मोटार वाहन कायद्यातील कलम १८५, १३० आणि १७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई पवन दादाराव दुनगहू, पोलीस स्टेशन देऊळगाव राजा यांनी सरकारतर्फे दिली.
पोलिसांच्या नोंदीनुसार, घटनेनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रातून स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची नोंद पोहेकॉ सैयद मुसा यांनी केली असून पुढील तपास पोहेकॉ विश्वनाथ काकड करीत आहेत.
असोला फाटा परिसरातील या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मद्यधुंद अवस्थेत जडवाहने चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देत पोलिसांनी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

