Mahabreaking

[breaking_news]

  Fire at Digras Khurd: दिग्रस खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात आग; शासकीय दस्तावेज जळाले, लाखोंचे साहित्य चोरीला

Fire at Digras Khurd: पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिग्रस खुर्द गट ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संशयास्पदरीत्या आग लागून शासकीय दस्तावेज जळाल्याची तसेच लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासक यांनी मंगळवारी पातूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

. Fire at Digras Khurd

  ग्रामपंचायत कार्यालयात संशयास्पद आग; महत्त्वाचे कागदपत्रे भस्मसात, ५ ते ६ लाखांचा मुद्देमाल गायब

राहुल सोनोने

दिग्रस बु. : पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिग्रस खुर्द गट ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संशयास्पदरीत्या आग लागून शासकीय दस्तावेज जळाल्याची तसेच लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासक यांनी मंगळवारी पातूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Add

तक्रारीनुसार, ग्रामपंचायत कार्यालयात रात्रीच्या सुमारास आग लागल्याचे निदर्शनास आले. ही घटना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग लागली त्यावेळी कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचेही दिसून आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील काही साहित्य चोरीला गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामध्ये ४ ते ५ एलईडी टीव्ही, विद्युत खांबांवरील सुमारे ६० ते ६५ लाईटसह इतर साहित्य असा एकूण ५ ते ६ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.

add

या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून, आग लागण्यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांच्या मते, ही आग नैसर्गिक नसून हेतुपुरस्सर लावण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या आगीत ग्रामपंचायतीची अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून भारतीय तिरंगा ध्वजही जळाल्याचे सांगण्यात येत आहे. तिरंग्याचे जळणे हा अत्यंत संवेदनशील व गंभीर प्रकार असल्याने या घटनेची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर गावातील १५ ते २० ग्रामस्थ तक्रार नोंदविण्यासाठी पातूर पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र, तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांची लेखी तक्रार तत्काळ स्वीकारली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच पंचनामा तातडीने न करता दुसऱ्या दिवशी करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यानंतर काही युवकांनी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती देत तात्काळ कारवाईची मागणी केली.

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे ग्रामपंचायत कामकाजातील कथित भ्रष्टाचाराबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्या होत्या. दिग्रस खुर्द येथील ॲड. मंगेश इंगळे व मंगेश धोत्रे यांनी ग्रामपंचायतीत लाखो रुपयांच्या अपहाराबाबत तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने अकोला जिल्हा परिषदेकडून गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत चौकशीपूर्वीच ग्रामपंचायतीतील दस्तावेज जळाल्याने या घटनेबाबत ग्रामस्थांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top