Damini Squad: शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना छेडछाड, पाठलाग किंवा टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर दामिनी पथक, मेहकर यांनी साखरखेर्डा येथे भेट देऊन जनजागृती केली. यावेळी दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक द्रौपदी साळवे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, अशा प्रकारच्या घटना घडल्यास तातडीने दामिनी पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

विद्यार्थिनींना त्रास झाल्यास ११२ वर तक्रार करा; दामिनी पथक सज्ज : द्रौपदी साळवे
साखरखेर्डा : शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना छेडछाड, पाठलाग किंवा टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर दामिनी पथक, मेहकर यांनी साखरखेर्डा येथे भेट देऊन जनजागृती केली. यावेळी दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक द्रौपदी साळवे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, अशा प्रकारच्या घटना घडल्यास तातडीने दामिनी पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
साखरखेर्डा येथे काही दिवसांपूर्वी मुलींच्या मागे फिरणाऱ्या काही युवकांमुळे शाळेच्या परिसरात वादाची परिस्थिती निर्माण झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी दामिनी पथकाने पुढाकार घेत शाळा व महाविद्यालयांना भेट दिली. “विद्यार्थिनींना किंवा महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांकडून तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल,” असे साळवे यांनी स्पष्ट केले.
महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी दामिनी पथकाची निर्मिती केली असून, हे पथक महिलांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांमध्ये आणि विद्यार्थिनींमध्ये कायदेशीर हक्क, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि पोलिसांची मदत कशी घ्यावी याबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या संकल्पनेतून साखरखेर्डा येथील एस. ई. एस. हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज तसेच कै. भास्करराव शिंगणे कला, नारायणराव गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय येथे ७ जुलै रोजी सकाळी दामिनी पथकाने भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी वैष्णवी काळे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या.
महिला, विद्यार्थिनी किंवा पालकांना या संदर्भात काही अडचण अथवा तक्रार असल्यास ०७२६२-२४२४०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास संबंधित शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

