Leopard: बुलढाणा तालुक्यातील पाडळी येथे ५ जुलैच्या मध्यरात्री बिबट्याने गावात शिरून एका गोठ्यावर हल्ला करत चार बकऱ्या आणि एक बोकड असा एकूण पाच जनावरांचा बळी घेतला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुलढाणा तालुक्यात बिबट्याचा शिरकाव; गोठ्यातील चार बकऱ्या व एक बोकड ठार
सिध्दार्थ जाधव
पाडळी : बुलढाणा तालुक्यातील पाडळी येथे ५ जुलैच्या मध्यरात्री बिबट्याने गावात शिरून एका गोठ्यावर हल्ला करत चार बकऱ्या आणि एक बोकड असा एकूण पाच जनावरांचा बळी घेतला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलैच्या रात्री अंदाजे १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने पाडळी गावात प्रवेश केला. येथील अशोक रमेश सोनूने यांच्या घराशेजारील गोठ्यात शिरून त्याने गोठ्यातील चार बकऱ्या व एक बोकड ठार केले. त्यानंतर बिबट्याने एक बोकड ओढत नेल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी, ६ जुलै रोजी सकाळी ही बाब अशोक सोनूने यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अनेक ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी चार बकऱ्या मृतावस्थेत पडलेल्या दिसून आल्या.
घटनेची माहिती वनपाल, वनरक्षक तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बकऱ्यांचा पंचनामा केला.
यावेळी पोलिस पाटील, गिरडा येथील राजू गायकवाड, पाडळी येथील सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, पत्रकार सिद्धार्थ जाधव, शिवाजी डुकरे, अनिल सुलताने, मंगेश पवार, शिवाजी बुदुखले, गजानन जाधव, शिवाजी पवार, अमोल पवार, वसंत पवार, गजानन पवार, डॉ.गावंडे, बंडू गायकवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
या घटनेत नुकसान झालेल्या अशोक सोनूने यांना वनविभागाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पाडळी हे गाव डोंगरालगत असल्याने परिसरात नेहमीच जंगली प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे वन्य प्राणी गावाकडे येणार नाहीत यासाठी सुरक्षित उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

