Police raid liquor den :आरेगाव येथे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या एका इसमावर डोणगाव पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत ३,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अवैध देशी दारू विक्रीवर डोणगाव पोलिसांचा छापा; ४५ बाटल्या जप्त
डोणगाव : आरेगाव येथे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या एका इसमावर डोणगाव पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत ३,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी (दि. ६ जुलै) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आरेगाव येथे पंचांसमक्ष दारूबंदी कायद्यांतर्गत धाड टाकण्यात आली. यावेळी विकास मधुकर सदावर्ते (वय ४७, रा. आरेगाव, ता. मेहकर) हा कोणताही वैध परवाना नसताना देशी दारूची अवैध विक्री करताना रंगेहात आढळून आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ‘बॉबी संत्रा’ कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या ४५ सीलबंद देशी दारूच्या बाटल्या, किंमत ३,६०० रुपये, तसेच दारू वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली २० रुपये किमतीची वायरची थैली असा एकूण ३,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल पवन गाभणे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर घायाळ आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल पुंडलिक वाळले यांच्या पथकाने केली.
याप्रकरणी आरोपी विकास मधुकर सदावर्ते याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.

