Dispute over lighting : तालुक्यातील सावखेड भोई येथे शेतातील वादातून एका महिलेचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगावराजा तालुक्यातील सावखेड भोई येथे धक्कादायक प्रकार; चौघांवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगावराजा : तालुक्यातील सावखेड भोई येथे शेतातील वादातून एका महिलेचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कारभारी तुकाराम डोणे, अरुणा कारभारी डोणे, अश्विनी कारभारी डोणे आणि आकाश अर्जुन संभारे, सर्व रा. सावखेड भोई, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा, यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
ही घटना दि. 4 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास सावखेड भोई येथील शेतात घडली. फिर्यादी महिला शेतात काम करत असताना आरोपींनी संगनमत करून शेतातील धुरा पेटविल्याच्या कारणावरून तसेच जुन्या शेतीच्या वादातून तिच्याशी वाद घातल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी तिला अश्लील शिवीगाळ केली. तसेच आरोपी आकाश संभारे याने तिला खाली पाडून वाईट उद्देशाने छाती दाबल्याचा आरोप आहे. यावेळी “तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला मारून टाकू, तुलाही मारून या शेतात पुरून टाकू,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कायमी अप क्रमांक 304/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 296, 351(2), 351(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद महिला पोलीस हवालदार सुषमा उईके यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कुवारे करीत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी आणि API सविता कुवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

