Road waterlogged : येथील बसथांबा परिसरातील प्रमुख नालीवर मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी, पावसाचे पाणी थेट डांबरी रस्त्यावर साचत असून संपूर्ण बसथांबा परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सतत साचणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे केव्हाही गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

बसथांबा परिसराला तळ्याचे स्वरूप; नालीवरील अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी
डोणगाव : येथील बसथांबा परिसरातील प्रमुख नालीवर मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी, पावसाचे पाणी थेट डांबरी रस्त्यावर साचत असून संपूर्ण बसथांबा परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सतत साचणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे केव्हाही गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बसथांबा परिसरातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. रस्त्यालगत असलेल्या नालीवर वाढत्या अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडथळला गेला आहे. निचऱ्यासाठी जागाच उरली नसल्याने पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. डांबरी रस्त्यावर सतत पाणी साचून राहिल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
बसथांबा परिसर हा गावातील गजबजलेला भाग असल्याने येथे प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या घाण पाण्यामुळे पायदळ चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुचाकीस्वार अनेकदा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने घसरून पडत असल्याचे प्रकार घडत असून, एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी या समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळा अधिक तीव्र होण्यापूर्वी नालीवरील अतिक्रमण तात्काळ हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवून बसथांबा परिसरातील वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष न करता तातडीने नालीची सफाई, अतिक्रमण हटविण्याची मोहीम आणि रस्त्याची दुरुस्ती हाती घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

