Sant Muktabais palanquin arrives : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील विठुरायांच्या दर्शनासाठी निघालेल्या संत आदिशक्ती मुमुक्ताबाईंच्या पालखीचे देऊळगाव राजा शहरात शुक्रवारी (दि. ३ जुलै) सायंकाळी उत्स्फूर्त व भव्य स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, “मुक्ताबाईंचा जयघोष” आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात शहरात पालखीचे आगमन झाले. भर पावसातही भाविकांनी मोठ्या श्रद्धाभावाने पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांना चहा, पाणी व फराळाचे वाटप केले.

भर पावसातही भक्तांचा जल्लोष; देऊळगाव राजात मुक्ताबाई पालखीचे भव्य स्वागत
गजानन तिडके
देऊळगाव राजा : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील विठुरायांच्या दर्शनासाठी निघालेल्या संत आदिशक्ती मुमुक्ताबाईंच्या पालखीचे देऊळगाव राजा शहरात शुक्रवारी (दि. ३ जुलै) सायंकाळी उत्स्फूर्त व भव्य स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, “मुक्ताबाईंचा जयघोष” आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात शहरात पालखीचे आगमन झाले. भर पावसातही भाविकांनी मोठ्या श्रद्धाभावाने पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांना चहा, पाणी व फराळाचे वाटप केले.

देऊळगावमही येथून मार्गस्थ झालेली मुक्ताबाईंची पालखी देऊळगाव राजा शहरात दाखल होताच ठिकठिकाणी भाविकांनी तिचे स्वागत केले. शहरातील विविध भागांत पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महिलांनी पालखीचे औक्षण केले, तर विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांनी दर्शन घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून, या सोहळ्याला तब्बल 224 वर्षांची परंपरा लाभली आहे. राज्यातून सर्वप्रथम पंढरपूरला विठुरायांच्या भेटीसाठी पोहोचणाऱ्या पालख्यांपैकी मुक्तामाईंच्या पालखीला विशेष मान आहे. ही पालखी ३५ तालुक्यांसह अनेक शहरांत आणि खेड्यांतून मार्गक्रमण करणार आहे.
देऊळगाव राजा येथे पालखीने गुरुवारी मुक्काम केला. येथे श्री संत धोंडीराम महाराज मठात पालखीने विश्रांती घेतली असून, शनिवारी (दि. ४) सूर्योदयाच्या सुमारास पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातील जालना, अंबड, बीड, आष्टी आदी मार्गे पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखी आगमनावेळी ढोल पथकाच्या समवेत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि मुक्ताबाईंच्या जयघोषात संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते. ठिकठिकाणाहून वारकरी आणि भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होत असून, देऊळगाव राजातील स्वागत सोहळ्याने या धार्मिक परंपरेला भावपूर्ण आणि उत्साही स्वरूप प्राप्त झाले.

