Mahabreaking

[breaking_news]

 special voter list :सिंदखेडराजात मतदार यादी विशेष पुनरीक्षणाचा आढावा; २९ जुलैपर्यंत प्राथमिक कामे पूर्ण करा 

special voter list : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक मंगळवारी (१ जुलै) जालना रोडवरील जिजाऊ सृष्टी सभागृहात पार पडली. मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुनरीक्षण मोहिमेतील विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 special voter list

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला वेग; सिंदखेडराजा येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक

गजानन तिडके

देऊळगाव राजा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक मंगळवारी (१ जुलै) जालना रोडवरील जिजाऊ सृष्टी सभागृहात पार पडली. मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुनरीक्षण मोहिमेतील विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्रासह देशातील १६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि संबंधित यंत्रणेला निश्चित कालमर्यादेत विविध कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि पर्यवेक्षकांना कामाचा वेग वाढविण्यासह पारदर्शकतेने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये घरभेटी देऊन नवीन मतदार नोंदणी, वारस नोंदणी व स्थलांतरित मतदारांची पडताळणी करणे, मतदार यादीतील मृत व दुबार नोंदी शोधून त्यांची नोंद करणे, मतदारांना ‘एन्युमरेशन फॉर्म’चे वितरण करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून घेणे, तसेच ही माहिती ‘ईआरओनेट’ प्रणालीवर स्कॅन करून अपलोड करणे आदी कामांचा आढावा घेण्यात आला.

याशिवाय मतदारांच्या सुनावणीसंदर्भातील नोटिसा बजावणे, त्याबाबतचे अहवाल संबंधित ॲपवर वेळेत अपलोड करणे आणि सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या मोहिमेचा पहिला टप्पा ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पूर्ण करावयाचा असून, त्यानंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुढे दावे व हरकती स्वीकारणे, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, नोटिसा बजावणे आदी प्रक्रिया पूर्ण करून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या मोहिमेचे महत्त्व लक्षात घेता सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली आणि लोणार येथील गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत संगणक चालकांना या कामात सक्रिय सहभागी करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले. निवडणूक आयोगाचे हे महत्त्वाचे काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.

बैठकीस तहसीलदार अजित दिवटे (सिंदखेडराजा), तहसीलदार वैशाली डोंगरजाळ (देऊळगाव राजा), गटविकास अधिकारी अजित बांगर (सिंदखेडराजा), गटविकास अधिकारी देशमुख (लोणार), नायब तहसीलदार प्रवीणकुमार वराडे, गटशिक्षण अधिकारी स्वप्नील निकम (सिंदखेडराजा), गटशिक्षण अधिकारी (देऊळगाव राजा) तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top