Continuous rains : मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे धाड परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. सुरुवातीला झालेल्या अल्प पावसात काही ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या होत्या. मात्र त्यानंतर तीन-चार दिवस पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे थांबविली होती. आता बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्याने उर्वरित पेरण्या वेगाने पूर्ण होत आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा; पावसामुळे खरीप हंगामाला मिळाली नवसंजीवनी
नागेश मोहिते
धाड : मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे धाड परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. सुरुवातीला झालेल्या अल्प पावसात काही ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या होत्या. मात्र त्यानंतर तीन-चार दिवस पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे थांबविली होती. आता बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्याने उर्वरित पेरण्या वेगाने पूर्ण होत आहेत.
कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणीचा आराखडा तयार केला असून, तालुक्यातील सुमारे ५५ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड अपेक्षित आहे. पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, अशा सूचना कृषी विभागाने यापूर्वीच शेतकऱ्यांना दिल्या होत्या.
यंदा जून महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पेरण्या काहीशा उशिरा सुरू झाल्या. त्यामुळे उडीद आणि मूग पिकांची लागवड अत्यल्प प्रमाणात झाली आहे. मागील वर्षी मक्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याने यंदा सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा मोठा कल दिसून येत आहे.
यावर्षी तालुक्यात सुमारे ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी होण्याचा अंदाज आहे. तर मका व भाजीपाला मिळून सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड अपेक्षित आहे. भाजीपाला पिकांची लागवड जूनपूर्वीच पूर्ण झाली आहे.
सध्या पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने पेरणीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पावसामुळे झालेल्या विलंबाबाबत चिंता व्यक्त होत असली, तरी जुलै महिन्यातही सोयाबीनची पेरणी यशस्वी ठरत असल्याचे अनुभवी शेतकरी सांगतात.
यंदा पावसाबाबत विविध अंदाज व्यक्त करण्यात आले असले, तरी सरासरी पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये आशावाद आहे. सोयाबीन बियाण्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे पेरणीसाठी वापरले आहे. त्यामुळे कृषी केंद्रांवरही बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून परिसरात समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. आता पावसाने सुरुवात केल्यामुळे पाणीटंचाईत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र तालुक्यातील बहुतांश लघु व मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा अद्याप कमी असल्याने आगामी काळात जोरदार पाऊस होऊन धरणे भरावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लवकरच खरीप हंगामातील पेरणीची कामे पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात असून, शेतकऱ्यांसह कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांच्या नजरा आता आगामी पावसाकडे लागल्या आहेत.

