Zilla Parishad schools: नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरखेर्डा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती नोंदविण्यात आली. नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पाठ्यपुस्तकांचे वितरण आणि विविध स्वागतपर उपक्रमांद्वारे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत शिंदी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

साखरखेर्डा व शिंदी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; प्रभातफेरी, वृक्षारोपण आणि पुष्पगुच्छांनी नवागतांचे स्वागत
साखरखेर्डा : नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरखेर्डा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती नोंदविण्यात आली. नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पाठ्यपुस्तकांचे वितरण आणि विविध स्वागतपर उपक्रमांद्वारे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत शिंदी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

साखरखेर्डा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (कन्या) आणि जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा अशा तीन शाळांमध्ये प्रवेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले) येथे इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव व सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेची पटसंख्या १०० असताना पहिल्याच दिवशी १०५ विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यात आल्याने शिक्षक व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
जिल्हा परिषद कन्या शाळेतही विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेतही नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, यासाठी शिक्षकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी भेट देऊन पालकांशी संवाद साधला. शाळेत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उपलब्ध सुविधा यांची माहिती देण्यात आली. शाळेच्या परिसरात स्वागत फलक उभारण्यात आले, तर काही विद्यार्थ्यांचे वाढदिवसही साजरे करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान स्वागतगीत सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे यांनी गोष्टींच्या माध्यमातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख संतोष सरकटे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
शिंदीत प्रभातफेरीने प्रवेशोत्सवाला सुरुवात
दरम्यान, सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शिंदी येथेही ३० जून रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विद्यार्थ्यांनी “जिल्हा परिषद शाळा आहे आपल्या हक्काची”, “जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या, उच्च शिक्षण घ्या” अशा घोषणा देत संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढली.
नवप्रवेशित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षण समितीचे सदस्य आणि शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रभातफेरीदरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, साखरखेर्डा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अच्युतराव खरात तसेच सेवानिवृत्त शिक्षक विश्वासराव खरात यांनीही विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन्ही गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पालकांचा सहभाग आणि शिक्षकांनी केलेले नियोजन यामुळे प्रवेशोत्सव आनंददायी व संस्मरणीय ठरला.

