Special voter verification: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात ३० जून ते २९ जुलै या कालावधीत ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, या मोहिमेसाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार अजित दिवटे यांनी दिली.
मतदार यादी होणार अधिक अचूक व अद्ययावत; ३४० बीएलओंसह प्रशासन सज्ज
अशोक इंगळे
सिंदखेडराजा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात ३० जून ते २९ जुलै या कालावधीत ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, या मोहिमेसाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार अजित दिवटे यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असून, मतदारांनी प्रशासनाला सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी मतदारसंघात ३४० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), ६८ पर्यवेक्षक (Supervisors) आणि ३४ झोनल अधिकारी (Zonal Officers) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांचे प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, मोहिमेसाठी आवश्यक साहित्याचेही वाटप करण्यात आले आहे.
सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील बीएलओ, पर्यवेक्षक आणि झोनल अधिकाऱ्यांचे संयुक्त प्रशिक्षण जिजाऊसृष्टी, सिंदखेडराजा येथे पार पडले. तर देऊळगाव राजा व चिखली तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देऊळगाव राजा येथे आयोजित करण्यात आले. दोन्ही ठिकाणी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी उपस्थित राहून मोहिमेच्या कार्यपद्धतीचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच क्षेत्रीय कामकाजादरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले.
घराघरांत जाऊन बीएलओ करणार पडताळणी
३० जूनपासून बीएलओ प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन आवश्यक माहिती संकलित करतील. या प्रक्रियेत ते मतदारांना आवश्यक त्या अधिकृत अर्जांचे (नवीन नाव नोंदणी, दुरुस्ती किंवा नाव वगळणे) वितरण करतील. मतदारांनी संबंधित अर्ज स्वतः संपूर्ण व अचूक माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बीएलओंकडे जमा करावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदारांना प्रशासनाचे आवाहन
मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे तसेच मयत व दुबार नावे वगळणे हा या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम करण्यासाठी सर्व मतदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. घरपोच येणाऱ्या बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देत योग्य अर्ज भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोहिमेचे वेळापत्रक एका दृष्टीक्षेपात
मोहीम कालावधी : ३० जून ते २९ जुलै
प्रशासकीय यंत्रणा : ३४० बीएलओ, ६८ पर्यवेक्षक, ३४ झोनल अधिकारी
कार्यक्षेत्र : सिंदखेडराजा, लोणार, देऊळगाव राजा आणि चिखली तालुक्यातील २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान क्षेत्रे
नियंत्रण : निवडणूक निर्णय अधिकारी, २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ


