Relief for farmers: मार्च २०२६ मध्ये राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अकोला, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांसाठी एकूण १३ कोटी २७ लाख ९८ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीस मंजुरी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय २५ जून २०२६ रोजी जारी केला असून, मदतीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे.

१२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ; अकोला, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यासाठी १३.२७ कोटींच्या मदतीस शासनाची मंजुरी
बुलढाणा : मार्च २०२६ मध्ये राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अकोला, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांसाठी एकूण १३ कोटी २७ लाख ९८ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीस मंजुरी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय २५ जून २०२६ रोजी जारी केला असून, मदतीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार तिन्ही जिल्ह्यांतील १४ हजार ७१६ बाधित शेतकऱ्यांच्या ७ हजार ९३४.७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीसाठी ही आर्थिक मदत वितरित केली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक निधी बुलढाणा जिल्ह्यास मंजूर झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील १२ हजार ५२ शेतकऱ्यांच्या ६ हजार ६१०.६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीसाठी १० कोटी ९९ लाख ३९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यातील १ हजार ४७६ शेतकऱ्यांच्या ९७५.३१ हेक्टर क्षेत्रासाठी १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपये, तर भंडारा जिल्ह्यातील १ हजार १८८ शेतकऱ्यांच्या ३४८.७८ हेक्टर क्षेत्रासाठी ५९ लाख ३३ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.
मदत वितरण प्रक्रियेत कोणत्याही लाभार्थ्याची दुबार नोंद होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने संबंधित जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत. तसेच एका हंगामात विहित दरानुसार केवळ एकदाच मदत दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे मंजूर झालेली ही आर्थिक मदत बँकांनी कर्जवसुली अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी अडवू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
मदत वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि निधीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच निधीच्या खर्चाचे लेखापरीक्षण व ताळमेळाची जबाबदारी संबंधित विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे.
मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने आवश्यक कार्यवाही पूर्ण केली असून, या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

