Food Security Scheme : मेहकर तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थी निवडीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मागील दीड ते दोन वर्षांपासून हजारो गोरगरीब, विधवा, दिव्यांग आणि गरजू नागरिक अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट होण्याच्या प्रतीक्षेत असताना, नुकताच मंजूर झालेल्या नव्या इष्टांकाच्या लाभ वाटप प्रक्रियेवर विविध स्तरांतून शंका व्यक्त करण्यात येत आहेत.

३,५०० नवीन लाभार्थ्यांच्या समावेशावर संशय; एजंटमार्फत लाभ वाटपाची चर्चा
डोणगाव : मेहकर तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थी निवडीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मागील दीड ते दोन वर्षांपासून हजारो गोरगरीब, विधवा, दिव्यांग आणि गरजू नागरिक अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट होण्याच्या प्रतीक्षेत असताना, नुकताच मंजूर झालेल्या नव्या इष्टांकाच्या लाभ वाटप प्रक्रियेवर विविध स्तरांतून शंका व्यक्त करण्यात येत आहेत.
माहितीनुसार, मेहकर तालुक्यासाठी जून महिन्यात सुमारे ३,५०० लाभार्थ्यांचा नवीन इष्टांक मंजूर झाला आहे. यापूर्वी इष्टांक उपलब्ध नसल्याचे कारण देत अनेक पात्र अर्जदारांना प्रतीक्षा करावी लागत होती. तालुक्यातील अनेक गरीब, भूमिहीन, विधवा आणि दिव्यांग नागरिकांनी वेळोवेळी अर्ज सादर केले होते. मात्र, नवीन इष्टांक मंजूर झाल्यानंतरही अनेक जुने अर्जदार लाभापासून वंचित असल्याची तक्रार पुढे येत आहे.
स्थानिक पातळीवर अशी चर्चा आहे की, काही ठिकाणी एजंटांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नावे प्राधान्याने समाविष्ट केली जात आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष गरजू नागरिकांऐवजी इतरांना लाभ मिळत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. यामुळे लाभार्थी निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तहसील प्रशासनाने या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. विशेषतः मंजूर करण्यात आलेल्या ३,५०० लाभार्थ्यांची यादी आणि मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अर्जांची पडताळणी करून पात्रतेनुसार लाभ देण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, या संदर्भात पुरवठा निरीक्षक नवुशकुमार बोराडे यांनी स्पष्ट केले की, अन्नसुरक्षा योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून प्राप्त अर्जांची गावनिहाय छाननी केली जाणार आहे. ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी आणि संबंधित यंत्रणेमार्फत अर्जदारांचे उत्पन्न, आर्थिक परिस्थिती व इतर निकषांची पडताळणी केल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
तसेच लाभार्थ्यांनी कोणत्याही एजंटमार्फत न जाता स्वतः तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत, याबाबत स्पष्ट सूचना फलकावर लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अन्नसुरक्षा योजनेच्या लाभ वाटप प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात लाभार्थी निवड प्रक्रिया कितपत पारदर्शक राबविली जाते आणि जुन्या पात्र अर्जदारांना न्याय मिळतो का, याकडे आता तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

