State-level honor :अकोला जिल्ह्यातील तामसी येथील प्रगतशील युवा शेतकरी गणेश जगन्नाथ काळे यांची महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘युवा शेतकरी पुरस्कार-२०२३’साठी अमरावती विभागातून निवड झाली आहे. या निवडीमुळे तामसीसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नाविन्यपूर्ण शेतीची दखल; अमरावती विभागातून पुरस्कारासाठी निवड
राहुल सोनोने
वाडेगाव : अकोला जिल्ह्यातील तामसी येथील प्रगतशील युवा शेतकरी गणेश जगन्नाथ काळे यांची महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘युवा शेतकरी पुरस्कार-२०२३’साठी अमरावती विभागातून निवड झाली आहे. या निवडीमुळे तामसीसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र शासनाकडून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, नाविन्यपूर्ण प्रयोग राबविणाऱ्या आणि इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या शेतकऱ्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक व्यवसाय, उत्पादनवाढीसाठी केलेले प्रयोग तसेच शेतकरी बांधवांना दिलेले मार्गदर्शन यांची दखल घेऊन गणेश काळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
गणेश काळे यांनी शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करून उत्पादनक्षमतेत वाढ साधण्यासोबतच इतर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या कार्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना नव्या पद्धतींचा अवलंब करण्याची प्रेरणा मिळाली आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत शासनाने त्यांची निवड केल्याने हा पुरस्कार अकोला जिल्ह्यासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.
महाराष्ट्र शासनाचा हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. मुंबई येथे १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते गणेश काळे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या यशाबद्दल तामसी परिसरातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, कृषी अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणेश काळे यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

