Mahabreaking

[breaking_news]

Diversion near Ruikhed bridge: रुईखेड पुलाजवळील डायव्हर्शन पुरात वाहून गेले; भडगाव-चिखली मार्ग ५ तास ठप्प

Diversion near Ruikhed bridge: बुलढाणा तालुक्यातील रुईखेड-मायंबा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आल्याने रुईखेड येथील पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेले तात्पुरते डायव्हर्शन वाहून गेले. परिणामी भडगाव-चिखली मार्गावरील वाहतूक तब्बल चार ते पाच तास पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Diversion near Ruikhed bridge

  जोरदार पावसाचा फटका; रुईखेड-मायंबा परिसरातील वाहतुकीचा खोळंबा

बबन फेपाळे

रुईखेड-मायंबा   : बुलढाणा तालुक्यातील रुईखेड-मायंबा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आल्याने रुईखेड येथील पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेले तात्पुरते डायव्हर्शन वाहून गेले. परिणामी भडगाव-चिखली मार्गावरील वाहतूक तब्बल चार ते पाच तास पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

रुईखेड येथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी बाजूला तात्पुरता पर्यायी मार्ग (डायव्हर्शन) तयार करण्यात आला होता. मात्र, परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. आलेल्या पुराच्या पाण्याने डायव्हर्शन पूर्णतः वाहून गेल्याने रस्त्यावरील वाहतूक अचानक बंद पडली.

मार्ग बंद झाल्यामुळे धाड मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक प्रवाशांना तासन्‌तास पावसात प्रतीक्षा करावी लागली. विशेषतः महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही नागरिकांनी पुलालगत असलेल्या लोखंडी अँगलचा आधार घेत नदीकाठचा भाग ओलांडण्याचा प्रयत्न केला.

वाहतुकीची कोंडी वाढल्याने अनेक वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करीत धाडमार्गे चिखलीकडे वळावे लागले. त्यामुळे अतिरिक्त अंतर आणि वेळ खर्च करावा लागला.

विशेष म्हणजे, या रस्त्याच्या सुधारणेसाठी महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने सुमारे ३११ कोटी ६५ लाख रुपयांच्या खर्चाची कामे सुरू आहेत. मात्र, पुलाचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असते तर नागरिकांना या अडचणींना सामोरे जावे लागले नसते, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर पुलाच्या कामाच्या गतीवर आणि संबंधित यंत्रणांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सुरक्षित पर्यायी व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top