Sakharkherda Rural Hospital :अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यान्वयनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाने आवश्यक मनुष्यबळ भरतीला मंजुरी दिल्याने २६ विविध पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून लवकरच ग्रामीण रुग्णालय सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

१८ कोटींची इमारत सज्ज, आता मनुष्यबळही मिळणार; ग्रामीण रुग्णालय लवकरच सुरू होणार
साखरखेर्डा :अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यान्वयनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाने आवश्यक मनुष्यबळ भरतीला मंजुरी दिल्याने २६ विविध पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून लवकरच ग्रामीण रुग्णालय सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
साखरखेर्डा येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांकडून होत होती. तत्कालीन आरोग्यमंत्री तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या कार्यकाळात या मागणीला मंजुरी मिळाली. त्यानंतर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नातून रुग्णालयाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला आणि सुमारे १८ कोटी रुपये खर्चून भव्य इमारत उभारण्यात आली.
मात्र, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने रुग्णालय सुरू करण्यास विलंब होत होता. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर शासनाने कर्मचारी भरतीचा निर्णय घेतल्याने रुग्णालय सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्ह्यातील सर्वाधिक बाह्यरुग्ण (ओपीडी) नोंदविले जातात. दररोज सुमारे ३०० ते ३५० रुग्ण उपचारासाठी येथे येतात. विशेषतः पावसाळ्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडतात. गंभीर रुग्णांना उपचारासाठी चिखली किंवा बुलढाणा येथे हलवावे लागते. ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या पदांची भरती होणार
भरती प्रक्रियेत वैद्यकीय अधीक्षक (वर्ग-१), वैद्यकीय अधिकारी (गट-अ), अधिपरिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, सहाय्यक अधीक्षक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, कक्षसेवक, शिपाई, सफाई कामगार आणि वाहनचालक अशा विविध पदांचा समावेश आहे.
या सर्व पदांची भरती पूर्ण झाल्यानंतर साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. त्यामुळे साखरखेर्डासह परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार असून आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.

