Mahabreaking

[breaking_news]

Operation Prahar: ऑपरेशन प्रहारचा दणका; १५ गोवंशांची सुटका, ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

Operation Prahar: अकोला जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीच्या प्रकारांवर प्रभावी अंकुश आणण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १५ गोवंशांची सुटका केली. या कारवाईत सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचा गोवंश मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Operation Prahar

   अवैध गोवंश कत्तलीच्या अड्ड्यावर एलसीबीचा छापा; एका आरोपीला ताब्यात

अकोला : अकोला जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीच्या प्रकारांवर प्रभावी अंकुश आणण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १५ गोवंशांची सुटका केली. या कारवाईत सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचा गोवंश मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात एका गोठ्यात गोवंश जातीची जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आली आहेत.

माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ छापा टाकला. यावेळी गोठ्याचा मालक मोहम्मद अदनान शेख इरफान (वय २०, रा. खैर मोहम्मद प्लॉट, अकोला) याला ताब्यात घेण्यात आले.

छाप्यामध्ये गोठ्यात जखमी अवस्थेत आणि अमानुष पद्धतीने कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आलेले १५ गोवंश आढळून आले. या सर्व जनावरांची सुटका करून त्यांना जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या गोवंशांची एकूण किंमत अंदाजे ४ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना तातडीने उपचार, देखभाल आणि संगोपनासाठी अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा संस्थानमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

दरम्यान, अकोला शहर व जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलीच्या प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे. गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींविरुद्ध प्रचलित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top