Grand felicitation : छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्ममहोत्सवानिमित्त दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, बुलढाणा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवन, सैनिकी मंगल कार्यालयाजवळ, संगम चौक, बुलढाणा येथे होणार आहे.

बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम; गुणवंतांसह गरजू विद्यार्थ्यांनाही मदतीचा हात
बुलढाणा : छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्ममहोत्सवानिमित्त दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, बुलढाणा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवन, सैनिकी मंगल कार्यालयाजवळ, संगम चौक, बुलढाणा येथे होणार आहे.
या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षा, क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवासोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही करण्यात येते. शालेय साहित्य, शैक्षणिक फी तसेच इतर आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार लावला जात आहे. आतापर्यंत ५० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी, साहित्य आणि शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत पुरविण्यात आली आहे.
यंदाच्या कार्यक्रमातही पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत मदत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी रुपेश खंडारे यांच्या हस्ते होणार असून आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त स्वप्निल साबळे आणि शिक्षणतज्ज्ञ अरविंद पवार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय नवी मुंबईच्या डीवायएसपी मोनिका साळवे, आरएफओ सारिका घेवंदे, गटविकास अधिकारी दिनेश चौतमोल, आरटीओ दिपाली सपकाळ, एसबीआयचे सिस्टीम मॅनेजर अक्षय खिल्लारे तसेच पुढारी न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी संदीप वानखडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे सचिव कुणाल पैठणकर तसेच ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

