FDA conducts major raid : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात सुरू असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अकोला पथकाने तेल्हारा येथे मोठी कारवाई केली. या कारवाईत गुटखा, पानमसाला व अन्य प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून वाहनासह एकूण 11 लाख 19 हजार 484 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक उघड; वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
अकोला : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात सुरू असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अकोला पथकाने तेल्हारा येथे मोठी कारवाई केली. या कारवाईत गुटखा, पानमसाला व अन्य प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून वाहनासह एकूण 11 लाख 19 हजार 484 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी राज्य शासनाने गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी तसेच तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्रीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, तेल्हारा शहरात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा घेऊन एक चारचाकी वाहन विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेल्हारा-माळेगाव मार्गावर सापळा रचून संबंधित वाहनाची तपासणी केली.
तपासणीदरम्यान वाहनामध्ये 6 लाख 19 हजार 484 रुपयांचा गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी वाहन चालक देवीलाल सज्जनलाल जैसवाल (वय 33, रा. लाडणापूर, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) तसेच अन्य दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 223, 274, 275, 123 तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या कलम 59 अन्वये तेल्हारा पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल क्रमांक 432/2026 दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एमएच-40 एसी-5047 क्रमांकाची चारचाकी गाडी, अंदाजे 5 लाख रुपये किंमतीची, जप्त करण्यात आली. अशा प्रकारे वाहनासह एकूण 11 लाख 19 हजार 484 रुपयांचा मुद्देमाल तेल्हारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी र. द्या. सोळंके, कि. ह. बोरचाटे तसेच दक्षता विभाग, अमरावतीचे अन्न सुरक्षा अधिकारी सं. ए. सूर्यवंशी यांनी संयुक्तपणे केली.
दरम्यान, गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

