Shri sant Gajanan Maharaj : संत एकनाथ महाराजांनी वर्णन केलेल्या पंढरपूर वारीच्या महात्म्याचा प्रत्यय सध्या विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव नगरीत येत आहे. वारकरी संप्रदायात अत्यंत मानाचे स्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या ५७ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे रविवारी सकाळी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. विठूरायाच्या दर्शनाची ओढ आणि मुखी अखंड हरिनाम घेत शेकडो वारकरी श्रींच्या पालखीसोबत पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाले आहेत.

‘जय हरी विठ्ठल’च्या गजरात श्रींच्या पालखीचे प्रस्थान; १३०० किमींची भक्तीवारी सुरू
शेगाव : संत एकनाथ महाराजांनी वर्णन केलेल्या पंढरपूर वारीच्या महात्म्याचा प्रत्यय सध्या विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव नगरीत येत आहे. वारकरी संप्रदायात अत्यंत मानाचे स्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या ५७ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे रविवारी सकाळी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. विठूरायाच्या दर्शनाची ओढ आणि मुखी अखंड हरिनाम घेत शेकडो वारकरी श्रींच्या पालखीसोबत पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाले आहेत.

सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या पालखी सोहळ्यात सुमारे ७०० हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. विणेकरी, पताकाधारी, गायक, मृदंगवादक आणि सेवेकरी यांच्या सहभागामुळे संपूर्ण दिंडी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. टाळ-मृदंगाच्या निनादात, ‘जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल’ तसेच ‘गण गण गणात बोते’च्या अखंड गजराने शेगाव नगरी दुमदुमून गेली. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेले वारकरी मजल-दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीची वाट चालत आहेत.

यंदाच्या वारीत वारकऱ्यांना तब्बल ७५० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. अकोला, रिसोड, नरसी नामदेव, औंढा नागनाथ, परभणी, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर आणि मंगळवेढा या पवित्र स्थळांमधून मार्गक्रमण करीत पालखी २३ जुलै रोजी आषाढ शुद्ध नवमीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूर येथे पाच दिवस मुक्काम केल्यानंतर परतीचा प्रवास सुरू होणार असून, जाण्या-येण्याचा एकूण सुमारे १३०० किलोमीटरचा पायी प्रवास वारकरी भक्तिभावाने पूर्ण करणार आहेत.
पंढरपूरच्या आषाढी वारीला वारकरी परंपरेत विशेष महत्त्व आहे. गजानन महाराजांनी स्वतः हजारो भाविकांसह वारी केल्याचे उल्लेख आढळतात. त्याच परंपरेचा वारसा जपत गेल्या ५६ वर्षांपासून ही वारी अखंड सुरू असून यंदाचे हे ५७ वे वर्ष आहे. त्यामुळे या पालखी सोहळ्याला धार्मिक आणि ऐतिहासिक असे दुहेरी महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही वारी म्हणजे केवळ प्रवास नसून भक्ती, शिस्त आणि समर्पणाची साधना आहे. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता विठ्ठलनामाचा जप करत वारकरी पुढे जातात. मार्गातील मुक्कामस्थळी काकड आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पालखी मार्गावरील अनेक गावे भक्तीमय वातावरणाने भारून जातात.
आता ३३ दिवसांच्या या खडतर पण आनंददायी प्रवासानंतर श्रींची पालखी २३ जुलै रोजी पंढरपूर नगरीत दाखल होणार असून, विठूरायाच्या दर्शनासाठी वारकरी आतुर झाले आहेत.

