Mahabreaking

[breaking_news]

Paturkars fate sealed: पातूरकरांचा कौल मतपेटीत बंद; 73.33 टक्के मतदानाने रंगली प्रतिष्ठेची लढत

Paturkars fate sealed: पातूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शनिवारी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 73.33 टक्के मतदान केले. कडाक्याचे ऊन आणि वाढत्या उष्णतेची पर्वा न करता तब्बल 13 हजार 150 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत नगरपालिकेच्या सत्तेचा कौल मतपेटीत बंद केला. त्यामुळे आता पातूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.

Paturkars fate sealed

कडाक्याच्या उन्हालाही हरवला लोकशाहीचा उत्साह; पातूरमध्ये विक्रमी मतदान

निशांत गवई

पातूर : पातूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शनिवारी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 73.33 टक्के मतदान केले. कडाक्याचे ऊन आणि वाढत्या उष्णतेची पर्वा न करता तब्बल 13 हजार 150 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत नगरपालिकेच्या सत्तेचा कौल मतपेटीत बंद केला. त्यामुळे आता पातूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.

नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असून नगरसेवकांच्या 20 जागांसाठी 75 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. शहरातील एकूण 17 हजार 933 मतदारांपैकी 8 हजार 869 पुरुष आणि 9 हजार 64 महिला मतदार आहेत. यापैकी 6 हजार 870 पुरुष आणि 6 हजार 280 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर कडक उन्हामुळे मतदानाचा वेग काहीसा मंदावला होता. दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे 37 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मात्र दुपारनंतर तापमानात काहीशी घट होताच मतदारांनी मतदान केंद्रांकडे मोठ्या संख्येने धाव घेतली. अनेक केंद्रांवर सायंकाळपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांनीही उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते दिवसभर मतदारांशी संपर्क साधताना दिसून आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवत शांततापूर्ण मतदानाची व्यवस्था केली होती.

निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी विकास योद्धा मंच-वंचित बहुजन आघाडी-एमआयएम युतीचे हाजी सै. बुऱ्हाण सै. नबी, काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीचे हिदायत खान रूम खान, भाजपचे सचिन ढोणे, शिवसेना (शिंदे गट)चे सुभाष बोचरे आणि अपक्ष सलाबत खान हाफिजउल्ला खान यांच्यात थेट सामना रंगला आहे.

विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी भाजप, काँग्रेस-उबाठा युती आणि विकास योद्धा मंच-वंचित-एमआयएम आघाडी यांच्यात तिरंगी संघर्ष झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे पातूरच्या सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हाती जाणार, याबाबत शहरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता मतमोजणीनंतर पातूरच्या नगरपालिकेवर कोणता झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top