Village Jambhu : एकेकाळी बोरगाव मंजू, वाशिंबा तसेच परिसरातील ग्रामीण भागात ओढे, नाले आणि शिवार परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळणारी गावरान जांभळाची झाडे आता दुर्मिळ होत चालल्याचे चित्र आहे. पर्यावरणीय समतोल राखणारे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे हे वृक्ष कालांतराने नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत.

ओढे-नाल्यांवरील जांभळांची सावली हरवली; ग्रामीण भागातील जैववैविध्य धोक्यात
संजय तायडे
बोरगाव मंजू : एकेकाळी बोरगाव मंजू, वाशिंबा तसेच परिसरातील ग्रामीण भागात ओढे, नाले आणि शिवार परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळणारी गावरान जांभळाची झाडे आता दुर्मिळ होत चालल्याचे चित्र आहे. पर्यावरणीय समतोल राखणारे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे हे वृक्ष कालांतराने नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत.
दोन दशकांपूर्वी परिसरातील ओढे-नाल्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणावर गावरान जांभळाची झाडे होती. या झाडांपासून मिळणाऱ्या फळांना शहरांमध्ये मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळत होते. मात्र आज ही दृश्ये हळूहळू इतिहासजमा होताना दिसत आहेत.
रस्त्यांच्या कडेला, शिवारात आणि नदी-नाल्यांच्या परिसरात सहज दिसणारी जांभळाची दाट झाडे आता क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे नव्या पिढीला गावरान जांभळाची नैसर्गिक चव अनुभवण्याची संधी कमी होत चालली आहे. जुन्या पिढीच्या आठवणीत असलेले हे फळ आता बाजारातही मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांत वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड, रस्त्यांचे रुंदीकरण तसेच शेतीच्या बदलत्या पद्धतींमुळे गावरान जांभळाच्या झाडांची संख्या झपाट्याने घटली आहे. पूर्वी नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या झाडांचे जतन केले जात होते; मात्र आता जुनी झाडे नष्ट होत असताना नवीन लागवडीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
आज बाजारात मिळणारी बहुतांश जांभुळे बाहेरून आणली जातात. मात्र गावरान जांभळाचा नैसर्गिक गोडवा, आंबटपणा आणि सुगंध याला वेगळीच ओळख आहे. पर्यावरणीय दृष्ट्याही ही झाडे महत्त्वाची मानली जातात. पक्ष्यांना निवारा, जनावरांना सावली आणि परिसरातील तापमान संतुलित ठेवण्याचे काम ही वृक्षे करतात.
आरोग्यासाठीही वरदान
गावरान जांभूळ हे केवळ स्वादिष्ट फळ नसून आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक मानले जाते. आयुर्वेदानुसार जांभूळ शरीराला थंडावा देणारे असून मधुमेह नियंत्रणासाठी त्याच्या बियांचा उपयोग केला जातो. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी, रक्तशुद्धीसाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठीही जांभूळ उपयुक्त असल्याचे मानले जाते. ग्रामीण भागात आजही अनेक घरांमध्ये जांभळाच्या बियांची पूड घरगुती औषध म्हणून वापरली जाते.
संवर्धनाची गरज
पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण जैववैविध्य जपण्यासाठी गावरान जांभळाच्या वृक्षांचे जतन करणे अत्यावश्यक बनले आहे. वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन आणि संरक्षण यावर भर देणे ही काळाची गरज आहे. अन्यथा भावी पिढीला गावरान जांभळाचा अनुभव केवळ पुस्तकांतील चित्रे आणि आठवणींपुरताच मर्यादित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

