Mahabreaking

[breaking_news]

Dry Mrig spell :मृग कोरडे; बोरगाव मंजू परिसरात खरीप पेरण्या ठप्प, शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे

Dry Mrig spell : यंदाच्या खरीप हंगामात बोरगाव मंजू परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली असली तरी समाधानकारक पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत संपूर्ण कृषी क्षेत्र आहे.

Dry Mrig spell

पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; मशागत पूर्ण तरी शंभर टक्के पेरण्या रखडल्या

संजय तायडे
बोरगाव मंजू : यंदाच्या खरीप हंगामात बोरगाव मंजू परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली असली तरी समाधानकारक पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत संपूर्ण कृषी क्षेत्र आहे.
परिसरात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी तसेच भाजीपाला पिकांचा पेरा केला जातो. मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने अद्याप बहुतांश क्षेत्रावर पेरणी होऊ शकलेली नाही. सूर्यफूल, मका व तीळ या पिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून घट होत असल्याचेही चित्र आहे.
गत दोन दशकांपासून बदलत्या हवामानामुळे पावसाचे चक्र अनियमित झाले आहे. परिणामी उत्पादनात घट होत असून शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटत आहे. यावर्षी चांगला पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा आर्थिक जुळवाजुळव करून मशागत, महागडी बियाणे, खते आणि कीटकनाशकांची खरेदी केली. मात्र जून महिन्यातील मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पुरेसा व दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास शंभर टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. पाऊस आणखी लांबल्यास मूग व उडीद यांसारख्या नगदी पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

किडींचा वाढता प्रादुर्भाव
शेतीसाठी दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके मिळविण्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. त्यातच पिकांवर कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव ही मोठी समस्या बनली आहे. योग्य वेळी प्रभावी उपाययोजना न झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

सिंचन व्यवस्था अपुरी
ज्या शेतकऱ्यांकडे विहीर अथवा अन्य जलसिंचन सुविधा उपलब्ध आहेत त्यांनी मर्यादित प्रमाणात कापसाची लागवड सुरू केली आहे. मात्र भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने सिंचनाचीही चिंता वाढली आहे. पाऊस आणखी लांबल्यास बागायती क्षेत्रालाही फटका बसण्याची शक्यता आहे.

वन्य प्राण्यांचा वाढता त्रास
शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक संकटांबरोबरच वन्य प्राण्यांचा त्रासही गंभीर बनला आहे. रानडुक्कर, हरीण आणि रोही यांच्या कळपांकडून पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्रंदिवस शेताची रखवाली करावी लागत आहे.

निसर्गावरच शेतीचा भरोसा
गत काही वर्षांपासून अपेक्षित पाऊस न झाल्याने भूजल पातळी सतत घसरत आहे. पर्यायी सिंचन प्रकल्पांचा अभाव असल्याने परिसरातील बहुतांश शेतकरी अजूनही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे पावसाचा प्रत्येक दिवस उशिरा पडणे म्हणजे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत असून खरीप हंगामाचे भवितव्य सध्या आभाळाकडेच लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top