Thieves go on : तालुक्यातील मुर्ती गावात अज्ञात चोरट्यांनी हैदोस घालत दोन घरातून तब्बल ५ लाख ४३ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल;2.30 लाखांची रोकड केली लंपास
मोताळा : तालुक्यातील मुर्ती गावात अज्ञात चोरट्यांनी हैदोस घालत दोन घरातून तब्बल ५ लाख ४३ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिवशंकर मुरलीधर सोनुने (वय ५०, व्यवसाय – शेती व कृषी केंद्र चालक, रा. मुर्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. ही घटना १७ जून रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १८ जून रोजी पहाटे ३.४५ वाजेदरम्यान घडली.
फिर्यादी शिवशंकर सोनुने हे घराचा मागील दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने, रोकड तसेच महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. चोरी गेलेल्या ऐवजात सोन्याचे गहुमणी पोत, हेरिंग, नथ, गोफ, अंगठ्या, कानातील दागिने यांसह दुकानातील ट्रेझरमधील ५५ हजार रुपयांची रोकड आणि आधार कार्ड, पॅन कार्ड व एटीएम कार्ड असलेले पाकीट यांचा समावेश आहे. या घरातून सुमारे २ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
याच परिसरातील गजानन धोंडू सुरडकर यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांच्या घरातून सोन्याच्या अंगठ्या, पोथ, कानातील दागिने, ओम लॉकेट, बाळ्या यांसह लोखंडी पेटीतील १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. या घरातील चोरी गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ९५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही घरांमधून एकूण ५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याने मुर्ती गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन घरांत झालेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बळीराम खंडागळे यांच्या हाती सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला वेग दिला असून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी घरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

