Mahabreaking

[breaking_news]

Support for Ravikant Tupkars :रविकांत तुपकरांच्या उपोषणाला सिंदखेडराजातून पाठिंबा; जिजाऊ चरणी न्यायाची याचना

Support for Ravikant Tupkars : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने वारंवार मोडीत काढली असून कर्जमाफी, पीकविमा आणि नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक होत असल्याचा तीव्र संताप आज सिंदखेडराजा येथे व्यक्त करण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या चरणी नतमस्तक होत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी प्रार्थना करण्यात आली तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.

Support for Ravikant

कर्जमाफी, पीकविमा आणि शेतकरी न्यायासाठी सरकारविरोधात संताप; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

साखरखेर्डा : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने वारंवार मोडीत काढली असून कर्जमाफी, पीकविमा आणि नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक होत असल्याचा तीव्र संताप आज सिंदखेडराजा येथे व्यक्त करण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या चरणी नतमस्तक होत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी प्रार्थना करण्यात आली तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.

राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक महसूल मंडळांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी नोंदविण्यात आली. शासनाने मदतीची घोषणा केली, तसेच मुख्यमंत्र्यांनी पीकविम्याची घोषणा केली; मात्र आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई अथवा विम्याची रक्कम जमा झालेली नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे अन्नत्याग उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस सुरू आहे. मात्र शासन आणि प्रशासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

याच निषेधार्थ राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र भूमीत असलेल्या सिंदखेडराजा राजवाड्यात त्यांच्या प्रतिमेसमोर सरकारने काढलेला कर्जमाफीचा शासन निर्णय ठेवून सरकारला सद्बुद्धी मिळावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी शेतकरी योद्धा कृती समिती, क्रांतिकारी शेतकरी संघटना, लोकजागर परिवार तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, हा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याचा आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि अन्यायाविरोधात लढणाऱ्या रविकांत तुपकर यांच्या पाठीशी प्रत्येक शेतकरी ठामपणे उभा राहिला पाहिजे. सरकारने कर्जमाफीच्या शासन निर्णयातील जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के पीकविमा मंजूर करावा आणि रविकांत तुपकर यांच्या उपोषणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पुढील दोन ते तीन दिवसांत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा देण्यात आला. “शेतकऱ्याच्या घामाला दाम द्या, कष्टाला न्याय द्या; अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी आता गप्प बसणार नाही,” असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top