ST bus parked : किनगाव जट्टू येथे मुक्कामी उभी असलेल्या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना १६ जून रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता घडली. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली.

किनगाव जट्टूत एसटी बस जळाली; लाखोंचे नुकसान, आग लागण्याचे कारण अद्याप गूढ
रमेश खंडागळे
बीबी : किनगाव जट्टू येथे मुक्कामी उभी असलेल्या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना १६ जून रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता घडली. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली.
एसटी बसचे चालक महेश पांडुरंग घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणार-किनगाव जट्टू ही बसफेरी पूर्ण करून एसटी बस (क्र. एमएच-०६ एस-८९६६) रात्री ८.१५ वाजता किनगाव जट्टू येथे पोहोचली. प्रवाशांना उतरवल्यानंतर बस बसस्थानकाच्या मागील बाजूस ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभी करण्यात आली. त्यानंतर चालक आणि वाहक जेवण करून जवळील खोलीत विश्रांतीसाठी गेले होते.
दरम्यान, रात्री सुमारे १०.१५ वाजता “बसला आग लागली” असा आरडाओरडा ऐकून चालक आणि वाहक बाहेर आले. त्यांनी पाहिले असता बसच्या आतील भागातून धूर निघत होता आणि आग लागलेली दिसून आली.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. बसच्या खिडक्यांच्या काचा आतून बंद असल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी खिडक्यांच्या काचा फोडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. काहींनी घरातून पाणी आणले, तर काहींनी टँकर बोलावून घेतला. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. आग विझविण्याच्या कार्यात निलेश महाजन, गजानन मुर्तडकर, अमोल खारोडे, अन्वर शहा, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष खरात यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या आगीत बसमधील वायरिंग आणि काही आसने जळून खाक झाली असून अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत केली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बीबी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

