El Niño’ threat : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचा पाऊस विलंबाने येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल प्रशासनाने सतर्क राहून संभाव्य पाणीटंचाईचे नियोजन करावे. तसेच दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी करू नये, यासाठी गावपातळीवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.

पाणीटंचाई व दुबार पेरणी टाळण्यासाठी प्रशासन सतर्क; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गजानन तिडके
बुलढाणा : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचा पाऊस विलंबाने येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल प्रशासनाने सतर्क राहून संभाव्य पाणीटंचाईचे नियोजन करावे. तसेच दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी करू नये, यासाठी गावपातळीवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अमितकुमार दुबे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक कौशलेंद्रकुमार सिंग यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत संभाव्य पाणीटंचाई, लांबणीवर पडलेला पाऊस, खरीप पेरणी, बियाण्यांचे नियोजन, नैसर्गिक आपत्ती, शेतकरी कर्जपुरवठा तसेच शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
डॉ. देवरे यांनी सांगितले की, जमिनीत किमान पाच ते सहा इंच पावसाचे पाणी मुरून योग्य ओल निर्माण होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. घाईने पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याची आणि दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता असते. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने गावागावांत जनजागृती करावी. तसेच खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
खरीप हंगामासाठी पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला सन्मानपूर्वक व विनाविलंब पीककर्ज मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना दिल्या. शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकांचे हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून प्रत्येक बँक शाखेत स्वतंत्र ‘कृषी मदत केंद्र’ सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन सर्व तालुक्यांनी तातडीने कृती आराखडा तयार करावा. टंचाईच्या काळात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यकतेनुसार टँकर उपलब्ध करून द्यावेत. तसेच जलसंधारणाची कामे गतीने राबवून पशुधनासाठी चारा उपलब्ध राहील याचे नियोजन आतापासूनच करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘अग्रीस्टॅक’ नोंदणी अनिवार्य असल्याने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आपली नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

